वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा केली असून सुने लुसकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहेत. या स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला.
2014 आणि 2020 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने उपांत्य फेरी गाठली होती. तसेच गेल्या वर्षी झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता.
आयसीसीच्या आगामी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा सामना 10 फेब्रुवारीला लंकेविरुद्ध केपटाऊनमध्ये होणार आहे. या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील पुढील सामने 13 आणि 18 फेब्रुवारीला अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील लढत 21 फेब्रुवारीला होईल.
दक्षिण आफ्रिका महिला संघ- ऍनेरी डर्कसेन, एम. कॅप, लारा गुडॉल, ए. खाका, क्लो ट्रायोन, नडिने क्लर्क, शबनीम इस्माईल, तजमीन ब्रिट्स, मासाबाता क्लास, लॉरा वुलव्हर्ट, सिनालो जाफ्ता, एन. मलाबा, सुने लुस (कर्णधार), ऍनेक बॉश्च आणि डेलमी टकर.









