तिसऱ्या दिवशीही शहराच्या काही भागात पाणी नाही : नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दि. 16 रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे दि. 17 व 18 रोजी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. ऐन महाशिवरात्रीदरम्यान पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरवासियांना समस्यांचा सामना करावा लागला. मात्र रविवारीदेखील काही भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने रविवारची सुटी पाण्याच्या प्रतीक्षेत घालविण्याची वेळ नागरिकांवर आली. हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गेल्या महिन्याभरात तीनवेळा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तसेच काही अन्य कारणास्तव पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने महिन्याभरात केवळ 15 दिवसच पाणीपुरवठा झाला आहे. तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो याअर्थी केवळ चार दिवसच शहरवासियांना पाणी मिळाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहर आणि उपनगरात सर्वच परिसरात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यामुळे दि. 17 व 18 रोजी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होईल, असे एलअॅण्डटीच्यावतीने सांगण्यात आले. मात्र रविवार दि. 19 रोजीदेखील शहराच्या काही भागात पाणीपुरवठा झालाच नाही. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शहरवासीय रविवारी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. पण रविवारीदेखील नळाला पाणी आले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रविवारची सुटी पाण्याच्या प्रतीक्षेत वाया घालविण्याची वेळ नागरिकांवर आली. सोमवारी तरी पाणीपुरवठा सुरळीत होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार
पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाल्याने थांबविण्यात आलेल्या परिसरापासून रोटेशननुसार पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दोन दिवसांत सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.









