गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय
प्रतिनिधी /पणजी
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘सनबर्न’ आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई म्हणजेच खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मर्यादेपेक्षा जास्त आवाजात संगीत लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी खंडपीठाने मंडळावर ताशेरे ओढून कायदेशीर कारवाईचा आदेश देताना ‘सनबर्न’वर खटला भरण्याची सूचना केली होती.
‘सनबर्न’ महोत्सवासाठी अनामत म्हणून ठेवण्यात आलेली रु. 10 लाखाची रक्कम जप्त करण्याचेही ठरवण्यात आले. ठरवून दिलेली आवाजाची पातळीचे उल्लंघन करण्यात आले होते. कारवाई करण्याचा निर्णय प्रदूषण मंडळाने एकमताने घेतला आहे. मंडळाच्या सदस्य सचिवांना कायदेशीर कारवाईचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
‘सनबर्न’ने केलेल्या ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई न केल्याने खंडपीठाने गोवा पोलिसांना देखील धारेवर धरुन फटकारले होते. मंडळ व पोलिसांनी त्या विषयावरील जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी फक्त एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन खंडपीठाने दोघांनाही या प्रकरणी कारवाईचे आदेश देऊन त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रदूषण मंडळाने पावले उचलली असून पोलिसांनी अद्यापही कारवाईच्या दृष्टीने काही केल्याचे समोर आलेले नाही.
मागील वर्षी म्हणजे वर्ष 2022 च्या शेवटी डिसेंबरच्या 28 ते 30 तारखेला बार्देश तालुका किनारपट्टीवर ‘सनबर्न’ हा संगीत डान्स महोत्सव आयोजित करण्यात आला होता. नवीन वर्ष 2023 चे स्वागत हे त्याचे निमित्त होते. त्यावेळी रात्रभर धिंगाणा घालून मोठ्या कर्णकर्कश आवाजात संगीत लावण्यात आल्यामुळे परिसरातील जनतेला त्रास होऊन ध्वनी प्रदूषण झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जनहित याचिका खंडपीठासमोर सुनावणीस आली होती. ती सुनावणी करताना खंडपीठाने कारवाई करण्यास बजावले होते.









