किंग चार्ल्स यांनी दिले नियुक्तीपत्र, लीझ ट्रस यांचा राजीनामा
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषि सुनक आरुढ झाले असून त्यांना या पदाचे नियुक्तीपत्र राजे चार्ल्स (तिसरे) यांच्याकडून मिळाले आहे. या घटनेमुळे पाश्चिमात्य जगात इतिहास घडला असून प्रथमच एका भारतीय वंशाच्या हिंदू नेत्याला सत्ताधीश होण्याचा मान मिळाला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनक यांनी मागच्या पंतप्रधान लीझ ट्रस यांच्या चुका सुधारण्याचा निर्धार व्यक्त केला. ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावर आणणे हे आपले ध्येय आहे अशा अर्थाचे वक्तव्य त्यांनी पंतप्रधान या नात्याने केलेल्या प्रथम भाषणात केले.
बेचाळीस वर्षांच्या सुनक यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी ब्रिटनचे राजे चार्ल्स (तिसरे) यांची ऐतिहासिक बकिंगहॅम राजवाडय़ात भेट घेतली. राजे चार्ल्स यांनी त्यांना पंतप्रधानपदाचे नियुक्तीपत्र दिले. तसेच नवे सरकार बनविण्याचा आदेश दिला. आधीच्या कार्यक्रमानुसार सुनक यांचा शपथविधी 28 ऑक्टोबरला होणार होता. तथापि या कार्यक्रमात परिवर्तन करुन पदग्रहण समारंभ आज मंगळवारी करण्यात आला. बकिंगहॅम राजवाडय़ाच्या कक्ष क्रमांक 1,844 येथे राजे चार्ल्स यांची त्यांच्याशी भेट झाली. ब्रिटीश परंपरेनुसार सुनक आपल्या स्वतःच्या कारने राजवाडय़ात पोहचले. मात्र पंतप्रधानपदाची सूत्रे हाती आल्यानंतर ते सरकारी कारमधून ते ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’ येथे पोहचले. या कालावधीत त्यांच्या पत्नीही त्यांच्यासह उपस्थित होत्या.
राष्ट्राला उद्देशून भाषण
आपल्या अधिकृत निवासस्थानातून सुनक यांनी आपल्या राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ब्रिटनची अर्थव्यवस्था सध्या संकटात आहे. अशा स्थितीत मी सरकार स्थापन करणार आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आधीपासूनच होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली. मागच्या पंतप्रधान लीझ ट्रस यांनी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न थकता काम केले. तथापि, काही चुका झाल्या. आता आपल्याला या स्थितीतून मार्ग काढावा लागणार आहे. झालेल्या चुका आता दुरुस्त केल्या जातील, असे आश्वासक उद्गार सुनक यांनी भाषणात काढले.
देशाची एकजूट महत्वाची
मी या देशाची एकजूट पुन्हा घडवून आणणार आहे. हे मी केवळ तोंडी म्हणत नाही, तर प्रत्यक्षात ते घडविण्याचा माझा प्रयत्न असणार हे निश्चित आहे. या देशाच्या जनतेसाठी मी दिवसरात्र काम करणार आहे. 2019 मध्ये हुजूर पक्षाला जनादेश मिळाला होता. मात्र तो एखाद्या व्यक्तीसाठी नव्हता तर पक्षाने आरोग्य, सीमासुरक्षा आणि सैनिकांचे हित या मुद्दय़ांवर तो मिळविला होता. माझे सरकारही या तीन महत्वाच्या मुद्दय़ावर कार्य करणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
समोर अनेक आव्हाने
या देशाचा अर्थमंत्री या नात्याने मी बरेच काम केले आहे. काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. तेच काम आता पंतप्रधान झाल्यानंतरही मी सुरु ठेवणार आहे. आज आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. ती स्वीकारताना मी प्रयत्कांची पराकाष्ठा करणार आहे. देशाच्या समस्यांकडे आपण राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहणे आवश्यक आहे. लोकहिताला राजकारणाच्या वरचे स्थान देणे आवश्यक आहे. आपला मार्ग निश्च्तिपणे खडतर आहे. मात्र, प्रयत्न आणि निर्धार यांच्बा बळावर आपण यशस्वी होऊ असे उद्गार त्यांनी काढले.
राजे चार्ल्स यांच्याशी अर्धातास चर्चा
सुनक आणि ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्यात सुनक यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी साधारणतः 31 मिनिटे चर्चा झाली. यावेळी सुनक यांच्या पत्नी अक्षताही त्यांच्यासह होत्या. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली त्याची घोषणा करण्यात आली नाही. तथापि ही चर्चा औपचारिक होती. त्यांच्या भेटीपूर्वी आधीच्या पंतप्रधा न लीझ ट्रस यांनीही राजे चार्ल्स यांची भेट घेतली आणि आपले त्यागपत्र सादर केले. राजे चार्ल्स यांनी ते स्वीकारल्यानंतर सुनक यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग खऱया अर्थाने मोकळा झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
एकजूट रहाल तर पक्ष टिकेल
राजे चार्ल्स यांच्या भेटीसाठी निघण्यापूर्वी सुनक यांनी हुजूर पक्षाच्या सर्व खासदारांची आणि मंत्र्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे आपले विचार मांडले. आपण एकत्र राहिलो तरच देशासमोरची कठीण आव्हाने स्वीकारु शकणार आहोत. आपल्यात एकजूट राहिली तरच आपला पक्ष टिकाव धरेल असेही त्यांनी खासदारांना स्पष्टपणे सांगिल्याचे वृत्त आहे.
आता अर्थमंत्री शोधण्याची धडपड
बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात सुनक हे अर्थमंत्री होते. कोराना काळात सुनक यांनी काही महत्वाचे कल्पक निर्णय घेतल्याने ब्रिटनची अर्थव्यवस्था सुरळीत राहिली. कोरोना उदेकानंतर या निर्णयांचा लाभ ब्रिटनला मिळाला आहे. आता सुनक पंतप्रधान झाल्याने अर्थमंत्री कोण होणार यावर खल सुरु झाला आहे. अर्थमंत्री पंतप्रधानांच्या विश्वासातील असल्यास आर्थिक निर्णय सुरळीतपणे घेतले जाऊ शकतात. त्यामुळे अर्थमंत्र्यासंबंधी आता उत्सुकता आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
ड सुनक यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी सुनक यांचे कौतुक केले असून त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान होणे ही अद्भुत घटना आहे. हा जगाच्या इतिहासात एक मैलाचा दगड आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बायडेन यांनी त्यांची प्रतिक्रिया 24 ऑक्टोबरला व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करताना दिली.
ड आपला जावई ब्रिटनचा पंतप्रधान झाल्यावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही समाधान व्यक्त केले आहे. ऋषि सुनक ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अतिशय गंभीरपणे प्रयत्न करतील. त्यांच्या प्रयत्नांमध्ये ते यशस्वीही होतील, असे आशीर्वाद नारायण मूर्ती यांनी दिले आहेत. ब्रिटनचे उत्तरदायित्व त्यांच्यावर आहे. ते योग्यरित्या निभावतील असे प्रतिपादन मूर्ती यांनी केले.









