भारत 65 धावांनी विजयी, सूर्याचे नाबाद शतक, हुडाचे 4 बळी
वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई
सामनावीर सूर्यकुमार यादवचे अचंबित करणारे तडाखेबंद नाबाद शतक व दीपक हुडाने भेदक मारा करीत मिळविलेल्या चार बळींच्या जोरावर भारताने येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचे अर्धशतक व साऊदीने शेवटच्या षटकात केलेली हॅट्ट्रिक मात्र वाया गेली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी नेपियरमध्ये खेळविला जाईल.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर तिसऱया क्रमांकावर बढती मिळालेल्या 32 वर्षीय सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची मनमानी धुलाई करीत भारताला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. चौकार, षटकारांची मनसोक्त आतषबाजी करीत त्याने शेवटच्या 64 धावा केवळ 18 चेंडूत झोडपल्या. प्रेक्षकांना खुष करणाऱया या डावात त्याने 11 चौकार, 7 षटकार हाणत 217.64 इतक्या जबरदस्त स्ट्राईकरेटने 51 चेंडूत नाबाद 111 धावांचा पाऊस पाडला. त्याने असामान्य फटके लगावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे नामोहरम केले. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने 20 षटकांत 6 बाद 191 धावा जमविल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विल्यम्सन वगळता न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय माऱयाचा समर्थपणे मुकाबला करू शकले नाहीत. ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि त्यांचा डाव 18.5 षटकांत 126 धावांत आटोपला.
सलामीवीर देव्हॉन कॉनवे (22 चेंडूत 25) व विल्यम्सन (52 चेंडूत 61) यांनी 56 धावांची सलामी दिली. पण त्यांना व त्यांच्या अन्य सहकाऱयांना भारतीय माऱयासमोर मोठे फटके मारता न आल्याने आवश्यक धावगती वाढत गेली. कॉनवे वॉशिंग्टनला स्वीप करताना बॅकवर्ड स्क्वेअरलेगला झेलबाद झाला. बिग हिटर ग्लेन फिलिप्सला काहीतरी स्पेशल करणे भाग होते. त्याने चहलला स्वीपचा फटका मारून आपले इरादे स्पष्ट केले होते. पण दोन चेंडूनंतर याच फटक्याची पुनरावृत्ती करताना तो झेलबाद झाला. 14 व्या षटकांत त्यांची स्थिती 5 बाद 89 अशी झाली होती आणि त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या चहलने कमबॅक करीत 26 धावांत 2 बळी मिळविले. पार्ट टाईम ऑफस्पिनर दीपक हुडाने मात्र कमाल करीत 19 व्या षटकांत 3 बळी टिपले. त्याने एकूण 10 धावांत 4 बळी मिळविले. कर्णधार हार्दिकने या सामन्यात गोलंदाजी केली नाही.
पंत अपयशी, सूर्याचा धडाका
तत्पूर्वी, रिषभ पंतला सलामीला खेळविण्याचा प्रयोग पुन्हा एकदा फसल्याचे दिसून आले. त्याने 13 चेंडू संघर्ष करीत 6 धावा जमविल्या. त्यानंतर सूर्याने स्वतःच्या आगळय़ावेगळय़ा शैलीत फटकेबाजी करीत सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. इतर फलंदाजांनी इच्छाशक्ती दाखवली. पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही. त्यात सलामीवीर इशान किशन (31 चेंडूत 36), श्रेयस अय्यर (9 चेंडूत 13) यांचा समावेश आहे. पॉवरप्लेबद्दल या सामन्यात भारताचा जास्त फोकस असेल, असे वाटले होते. पण त्यात त्यांनी फारसे काही केले नाही. 6 षटकांत त्यांना 1 बाद 42 धावा जमविता आल्या.
सूर्याची स्वतंत्र शैलीची फटकेबाजी मात्र मनोरंजन करणारी होती. त्याने अचूक जागा शोधत वैविध्यपूर्ण टोलेबाजी करीत शतकी मजल मारली. स्पिनर्सनी त्याला ऑफस्टंपवर गोलंदाजी केली तेव्हा त्याने कव्हरवरून इनसाईड आऊट फटके मारले आणि जलद गोलंदाजांनी स्टंपच्या रोखाने गोलंदाजी केल्यावर त्याने फाईनलेगच्या पट्टय़ात षटकारासासाठी चेंडू पिटाळले. त्याने 11 चौकार, 7 षटकार वसूल करताना 49 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसरे शतक पूर्ण केले. फर्ग्युसनने टाकलेल्या 19 व्या षटकात त्याने जोरदार टोलेबाजी करीत चार चौकार, 1 उत्तुंग षटकार डीप पॉईंटच्या दिशेने ठोकला. त्याच्या अशा फटकेबाजीमुळे भारताने शेवटच्या 5 षटकांत 72 धावा वसूल केल्या. अखेरच्या षटकात साऊदीने मात्र हॅट्ट्रिक नोंदवल्याने सूर्याला स्ट्राईकची संधीच मिळाली नाही. त्याने वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा व हार्दिक पंडय़ा यांना बाद केले. या षटकात भारताला केवळ 5 धावा मिळाल्या.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 6 बाद 191 ः इशान किशन 36 (31 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), पंत 6, सूर्यकुमार यादव नाबाद 111 (51 चेंडूत 11 चौकार, 7 षटकार), श्रेयस अय्यर 13 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा 13 (13 चेंडू), हुडा 0, सुंदर 0, भुवनेश्वर नाबाद 1, अवांतर 11. गोलंदाजी ः साऊदी 3-34, फर्ग्युसन 2-49, सोधी 1-35.
न्यूझीलंड 18.5 षटकांत सर्व बाद 126 ः कॉनवे 25 (22 चेंडूत 3 चौकार), ऍलेन 0, विल्यम्सन 61 (52 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), फिलिप्स 12 (6 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), डॅरील मिचेल 10, नीशम 0, सँटनर 2, मिल्ने 6, सोधी 1, साऊदी 0, फर्ग्युसन नाबाद 1, अवांतर 8. गोलंदाजी ः दीपक हुडा 4-10, चहल 2-26, सिराज 2-24, भुवनेश्वर 1-12, सुंदर 1-24, अर्शदीप 0-29.
फिफा विश्वचषक फुटबॉल
आजचे सामने
1) इंग्लंड वि. इराण
वेळ ः सायं. 6.30 वा.
2) सेनेगल वि. नेदरलँड्स
वेळ ः रात्री 9.30 वा.
3) अमेरिका वि. वेल्स
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्पोर्ट्स 18
लाईव्ह स्ट्रीमिंग ः जिओसिनेमा ऍप.