कालचा दिवस बरा अशी रोजची अवस्था आहे. सूर्य आग ओकत असल्याने माणूस,पक्षी, प्राणी, वनस्पती जीवजंतू यांची होरपळ सुरु आहे. पाणवठे आटले आहेत. विहिरींनी तळ गाठले आहेत आणि अनेक शहरांना, महानगरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही मोठ्या शहरात पाच दिवसांनी, आठ दिवसांनी नळाला पाणी येते आहे. नद्यांचे नाले झाले आहेत. पारा 40 पार केव्हाच झाला आहे. विदर्भात तर पारा 43 अंश झाला आहे. विदर्भात चंद्रपुरात मंगळवारी पारा विक्रमी 43.7 अंश होता. अकोला, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वाशीम, यवतमाळमध्ये लाही – लाही सुरु आहे. कमाल आणि किमान तापमानात होणारी वाढ रस्ते निर्मनुष्य करताना दिसते आहे. पश्चिम महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. कावळे, चिमण्या, पोपट असे पक्षी व वनचर प्राणी या उष्णतेत होरपळून झाडावरुन पडताना दिसत आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण, गोवा सगळीकडे कमी अधिक हीच स्थिती आहे. कोपलेला सूर्य आणि काहीलीत भाजले जावे तसे होरपळत असलेले जीवन यामुळे अवघे त्रस्त आहेत. पुढील चार दिवस आणखी परीक्षा घेणारे ठरतील असे संकेत हवामान तज्ञ देत आहेत. पण आम्ही जनता हवामान शास्त्रज्ञांना व पर्यावरण अभ्यासकांना गांभिर्याने घेत नाही. ओघानेच कालचा दिवस मागचे वर्ष बरे म्हणायची वेळ येते आहे. जागतिक पातळीवर तापमान परिषदा होत असतात. निसर्गाचा, पर्यावरणाचा, अंतरिक्षाचा जीवसृष्टीचा अभ्यास होत असतो आणि शास्त्रज्ञ इशारे देत असतात. पण ते कोणी गांभिर्याने घेत नाहीत आणि घेतले तर त्यांची अंमलबजावणी होत नाही. पाणी, हवा, ध्वनी, माती, आकाश सर्व पातळीवर निसर्गाशी मोडतोड करुन खेळ खेळले जात आहेत आणि पर्यावरण रक्षण, संवर्धन हे भाषणापुरते उरले आहे. पॅरीस येथे पाच-सहा वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक तापमान परिषदेत अनेक ठराव झाले पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. श्रीमंत देश दुर्लक्ष करतात आणि गरीब राष्ट्रांना अनेक गोष्टी अशक्य असतात. ओघानेच अनेक प्राणी, पक्षी नष्ट होत आहेत. जमीन खराब होते आहे. नद्यांना गटारीचे स्वरुप आले आहे आणि युद्ध व अणुचाचण्या वगैरेमुळे आणखी बिकट अवस्था झाली आहे. महाथंडी, महावर्षा आणि महाउष्णता यांचे तडाखे पाठोपाठ बसत आहेत. महाराष्ट्रात तर गेल्या पंधरवड्यात दोन वेळा अवकाळीचे तडाखे बसले. कांदा, आंबा, द्राक्ष आणि उशीरा पेरलेला गहू वगैरे पिके उद्ध्वस्त झाली. अवकाळीचे हे दुष्टचक्र व त्यांचे पंचनामे आणि या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच उष्णतेची होरपळ सुरु झाली आहे. उष्माघाताचे बळी जात असल्याच्या वार्ता भीती वाढवत आहेत आणि इतकी आणीबाणी असतानाही जगात युव्रेन-रशिया युद्ध सुरु आहे. भक्तांचा अंत पाहणारे मेळावे होत आहेत. निवडणूक सभा आणि सत्तेसाठीच्या तडजोडी, शक्तीमेळावे, वज्रमेळावे वगैरे सारे सुरु आहे. खरे तर शासकीय पातळीवर या संकटकाळी काही ठोस निर्णय, बदल आणि हंगामी व्यवस्था गरजेची आहे. दुपारी 11 ते सायंकाळी चारपर्यंत उन्हात सभांना परवानगी नाकारली पाहिजे. लहान मुले व वृद्ध यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. रमजानचे उपवास अंतिम टप्प्यात आहेत. पण विना पाणी, विना अन्न असे उपवास परीक्षा घेणारे आहेत. शाळांना अजून सुट्टी नाही. काही परीक्षाही सुरु आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांची, बालकांची काळजी घेतली पाहिजे. पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे जगवा, जंगले तोडू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, शरीरातील पाणी व ऊर्जा कमी होऊ देऊ नका. तासाभराच्या अंतराने पाणी प्राशन करा, ताक, मठ्ठा, फळाचे रस आणि पेज वगैरे अन्न खा. टोपी, गॉगल, छत्री, पांढरे कपडे याचा वापर करा वगैरे सूचना असतात त्यांचे पालन केले पाहिजे. अन्नबाधा, पाणीबाधा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपणच केलेला पर्यावरणाचा ऱ्हास भरुन काढण्यासाठी आगामी अनेक वर्षे जाणीवपूर्वक काम केले पाहिजे. अन्यथा चंद्र, मंगळावर यान सोडू, निरनिराळी हत्यारे शोधून साम्राज्ये वाढवू, वेगवेगळ्या बँकात नोटाचे खच पाडू पण मोकळा श्वास घ्यावा अशी हवा नसेल, स्वच्छ प्रसन्न अन्न नसेल, तहान भागवेल असे पाणी नसेल. पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही. शोध, तंत्र, साधन, संपत्ती यांची रेलचेल असेल पण समाधानी आरोग्यपूर्ण जीवन नसेल. हे सारे सावरायचे असेल तर निसर्ग विध्वंसक तथाकथित प्रगती थांबवा. पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतीची चाळण करणारी बोअर मारु नका. अकारण डिझेल पेट्रोलचा धूर काढू नका, कार्बन उत्सर्जन थांबवा, सेंद्रिय शेतीकडे वळा, लोकसंख्या नियंत्रण ठेवा, राजकारणापलीकडचे मानवी हित, जनकल्याण आणि जैवविविधता, निसर्गरक्षण याकडे लक्ष द्या. अमेरिका हा आपला आदर्श नाही. आपले ग्रंथ, साधूसंत, महर्षी यांनी दिलेली शिकवण हीच यावर मात्रा ठरेल. पृथ्वी वाचवली पाहिजे ती वाचली तर आपण आणि आपण असलो तर नोटांची गणती अन्यथा आपलीच नव्हे तर जीवसृष्टीची माती होईल. सूर्य कोपला आहे. नुकतीच सुरुवात आहे. गतवर्षी काही ठिकाणी पारा 50 अंशाकडे झेपावत होता. अजून मे महिना आहे. अलीकडे ऋतूकाळातही बदल जाणवत आहेत. पावसाचे जे अंदाज येत आहेत तेही भयभीत करणारे आहेत. समुद्रातील पाणी तापते आहे. गरम वारे वाहते आहे. आगामी पावसाळा सामान्य असेल असा प्रथम अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर स्कायमेटने दुष्काळाचे भाकीत केले आहे. निसर्ग कसा बदलतो, कसे रुप धारण करतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण ढगफूटी, दुष्काळ, होरपळ, अवकाळी, गारपीट यांची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. ओघानेच महापूर, उष्माघात, थंडीचे बळी हे सगळे येतेच. ही सर्व आपल्या कर्माचीच फळे आहेत. आपण झाडे तोडली, डोंगर उघडे बोडके केले. चकाचक रस्ते बांधले आणि पेट्रोल डिझेलचे धूर काढत प्रगतीच्या गप्पा मारु लागलो. अमेरिकेला आदर्श ठेऊन वाटचाल आरंभली. ओघानेच तेथील वाईट गोष्टीही आल्या. आता डोळे उघडले पाहिजेत. आपणास कोणती गती प्रगती साधायची याचा रोडमॅप केला पाहिजे व स्वत:ला वाचवताना पृथ्वी वाचवली पाहिजे. तूर्त सूर्य कोपला आहे.
Previous Articleचांगलं बोला….
Next Article महिला नेत्याचे युथ काँग्रेस अध्यक्षांवर आरोप
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








