अध्याय सहावा
मृत्यूनंतर आपल्याला कोणती गती मिळणार ह्याची माणसाला उत्सुकता असते. त्याबद्दल बोलताना बाप्पा म्हणाले, मृत्यूनंतर माणसाला शुक्ल (ज्ञानरूप ) किंवा कृष्ण (अज्ञानरूप ) गती प्राप्त होते. एकीने तो अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्माला पावतो व दुसरीने संसाराला पावतो. तो श्लोक असा द्विविधा गतिरुद्दिष्टा शुक्ला कृष्णा नृणां नृप । एकया परमं ब्रह्म परया याति संसृतिम् ।। 21 ।। या श्लोकात मृत्यूनंतरच्या दोन गती किंवा दोन मार्ग बाप्पा सांगत आहेत.
एक प्रकाशाचा म्हणजे सूर्यमार्ग असून एक अंधाराचा म्हणजे चंद्रमार्ग होय. प्रकाश मार्गाने जाणारा साधक ज्ञानयुक्त असल्याने ब्रह्मपदी जातो तर अंधाराच्या मार्गाने जाणारा संसारात परत येतो. हे दोन्ही मार्ग शाश्वत आहेत असे श्रुतींनी मान्य केले आहे. जो ज्ञानयुक्त असतो तो सरळ ईश्वराप्रति पोहोचतो.त्यासाठी त्याला ईश्वर प्राप्तीची ओढ असावी लागते. त्या ओढीतूनच परमात्म्याचा शोध घेण्याचे कार्य तो जीवनभर करत असतो.
ईश्वराच्या कृपेने त्याच्यातील आत्मज्ञान प्रकट होते. त्यामुळे त्याला मृत्यूसमयी ईश्वराचे स्मरण होते आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशात तो सूर्यमार्गाने ईश्वराला जाऊन मिळतो. अर्थात ह्या मार्गापर्यंत येऊन पोहोचण्याचा प्रवास सहजसोपा नसतो. त्यासाठी साधकाने कित्येक जन्म खर्ची घातलेले असतात.
विशेष म्हणजे ह्या प्रवासाला त्याने सुरवात केली की, त्याची सर्व जबाबदारी ईश्वर घेत असल्याने त्याचा प्रवास दीर्घकाळाचा असला तरी त्याला त्याचे श्रम जाणवत नाहीत कारण ईश्वराच्या सहवासातील ती एक आनंदयात्रा असते.
अज्ञानी आणि भौतिक गोष्टींबद्दल अत्यंत आकर्षण वाटत असलेला मनुष्य मृत्यूनंतर चांद्रमार्गाने जाऊन स्वर्गात प्रवेश करतो. भले त्याने ईश्वराचे चिंतन केले नसेल पण तो लोकांशी वाईट वागलेला नसल्याने त्याच्या पुण्यसाठ्यानुसार त्याला स्वर्गीय सुखाचा लाभ होतो. त्याचा पुण्यसाठा संपल्यावर त्याला तेथून पुन्हा पृथ्वीतलावर पाठवले जाते. स्वर्गातून मोक्षाकडे जाण्याचा रस्ता नसल्याने त्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळून स्वत:च्या उध्दाराची आणखी एक संधी प्राप्त होते. माणसाने हे दोन्ही मार्ग जाणून घ्यावेत म्हणजे त्याच्या असे लक्षात येईल की, जर मोक्ष साधायचा असेल तर नुसते चांगले वागून चालणार नाही.
ईश्वरीतत्व समजून घेण्याचा त्याने प्रयत्न करायला हवा. त्यासाठी कर्म, योगसाधना किंवा भक्ती ह्यापैकी एक मार्ग निवडून त्यावर निष्ठेने चालायला हवे. सद्गुरूंच्या वचनात राहून त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करायला हवे. ह्या पद्धतीने साधना केल्यावर ईश्वर त्याच्यावर प्रसन्न झाल्याने त्याचे अज्ञान दूर होते. त्यामुळे त्याला मृत्यूपश्चात सूर्यमार्गाने मोक्षापर्यंत जाऊन ईश्वराशी एकरूप होण्याची संधी मिळते.
ज्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतले आहे तो सरळ सूर्यमार्गाने ईश्वराप्रती पोहोचतो तर जो सदाचारी असतो त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याची आणखी एक संधी पुनर्जन्मातून मिळते. ह्या दोन्हीपेक्षा तिसऱ्या प्रकारातील लोकही असतात. त्यांचा ईश्वरावर बिलकुल विश्वास नसल्याने ते बिनदिक्कत दुष्कृत्ये करत असतात. त्यांना मृत्यूनंतर खालच्या योनीत पुनर्जन्म मिळतो.
म्हणून वाट्याला आलेलं काम ईश्वराने दिलेलं आहे असं समजून निरपेक्षतेनं करून ईश्वरार्पण करावं. असं करत गेलं की, मोक्ष मिळतो, ब्रह्मप्राप्ती होते. प्रत्येक जीवाची सुरवात सकाम कर्मे करूनच होत असते पण बोध झाला की, तो वर सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मांचा प्रवास करत करत, निरपेक्षतेनं कर्मे करून ब्रह्मपदी पोहोचतो.
श्रीगणेशगीता अध्याय सहावा समाप्त








