तिघांना नोटीस : ईडी करणार आमने-सामने चौकशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि खासदार संजय सिंह यांच्या तीन निकटवर्तीयांना समन्स बजावले आहे. यामध्ये विवेक त्यागी, सर्वेश मिश्रा आणि कंवरबीर सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. ईडीचे अधिकारी या तिघांचीही संजय सिंह यांच्यासमोर आमने-सामने चौकशी करणार असल्याचे समजते. खासदार संजय सिंह सध्या ईडीच्या ताब्यात असून ते 10 ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असतील. त्यांना बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी छापासत्र आणि चौकशीअंती ईडीने दिल्लीतील सरकारी निवासस्थानातून अटक केली होती.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून स्वतंत्रपणे तपास केला जात आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपांबाबत आम आदमी पक्षाशी संबंधित नेतेमंडळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. संजय सिंह यांच्या निकटवर्तियांवरही अनेक आरोप केले जात आहेत. त्यांचा साथीदार सर्वेश मिश्राने संजय सिंहच्या घरातून दोनदा त्याच्या वतीने 2 कोटी ऊपये घेतल्याचा तपशील ईडीच्या हाती लागला आहे. तसेच अन्य दोघांचाही यासंबंधातील आर्थिक व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.









