वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याप्रकरणी गुजरातमधील न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप खासदार संजय सिंह यांना नव्याने समन्स बजावला आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 7 जून रोजी होणार आहे. यापूर्वी न्यायालयाने केजरीवाल आणि संजय सिंह यांना 15 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्या समन्समध्ये फारशी स्पष्टता नव्हती, यामुळे न्यायालयाने नव्याने समन्स जारी केला आहे.
या समन्समध्ये न्यायालयाने मानहानीप्रकरणी दाखल तक्रारीची प्रत संलग्न करविली आहे. न्यायालयाने केजरीवाल आणि सिंह यांना 7 जून रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदींच्या पदवीशी निगडित वादात अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांच्यावर गुजरात विद्यापीठाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप आहे.
गुजरात विद्यापीठाचे रजिस्ट्रार पीयूष पटेल यांच्याकडून दाखल याचिकेत केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यावर विद्यापीठाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप आहे. दोन्ही नेत्यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील विद्यापीठाच्या विरोधात चुकीच्या टिप्पणी केल्याचा आरोप आहे. पंतप्रधान मोदींच्या पदवीशी संबंधी माहिती देण्याच्या सीआयसीच्या आदेशाच्या विरोधात गुजरात विद्यापीठाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीआयसीचा आदेश रद्दबातल ठरविला होता. यानंतर दिल्लीत केजरीवाल आणि सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती.









