बांगलादेशचा निर्णय : त्रिपुरा प्रकरणाचा निषेध
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांमुळे संतप्त झालेल्या काही जणांनी त्रिपुरा राज्यातील बांगलादेशच्या व्यापारी दूतावासावर केलेल्या हल्ल्याचे पडसाद उमटत असून बांगलादेशने या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच भारताच्या त्या देशातील उच्चायोग अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील व्यापारी दूतावास बंद करण्याचा निर्णय त्या देशाने घेतला आहे.
ढाका येथील भारतीय उच्चायोगाचे अधिकारी प्रणय वर्मा हे मंगळवारी आपल्या कार्यालयात दुपारी चार वाजता आल्यानंतर त्यांना पाचारण करण्यात आले. त्यांना बांगलादेशाचे विदेश सचिव रियाझ हमीदुल्ला यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच अगरतळा येथील बांगलादेशाच्या दूतावास सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचनेपर्यंत बंद राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारताच्या विदेश विभागानेही या हल्ल्याचा निषेध केला असून कोणत्याही परिस्थितीत विदेशी व्यापारी दूतावास किंवा प्रतिनिधी यांच्यावर हल्ले केले जाऊ नयेत, अशी भारताची भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्रिपुरा सरकारचा इन्कार
बांगलादेशच्या आगरतळा येथील व्यापारी दूतावासावर हल्ला करण्यात आला असून दूतावासाची मोठी हानी झाली आहे, या वृत्ताचा त्रिपुराच्या राज्य सरकारने इन्कार केला आहे. हे वृत्त अतिरंजित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दूतावासात घुसण्याचा काही जणांनी प्रयत्न केला होता. तथापि, त्यांना रोखण्यात आले. तसेच दूतावासाची मोठी हानी झाल्याचेही वृत्त अतिरंजित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बांगलादेश या कथित घटनेचा बाऊ करून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही आरोप करण्यात येत आहे.
भारताच्या बसवर हल्ला
त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून कोलकाता येथे जाणाऱ्या बसवर बांगलादेशात हल्ला करण्यात आला आहे. ही बस नेहमीप्रमाणे ढाकामार्गे कोलकाता येथे जात होती. ढाका येथे महामार्गावर काही गुंडांनी या बसवर हल्ला करून तोडफोड केली. ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद त्रिपुरात उमटले असून त्यामुळे काही जणांनी बांगलादेशाच्या व्यापारी दूतावासात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बांगलादेशातील स्थिती चिंताजनक असून भारताला आता निर्णायक पावले उचलावीच लागतील, असे तज्ञांचे मत आहे.
वकिलाची हत्या
बांगलादेशातील इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मोय कृष्ण दास यांच्या वकिलांची ढाका येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी कोणीही वकील तयार होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी एक महिना लांबणीवर पडली आहे. परिणामी दास यांना एक महिना आता कारागृहात काढावा लागणार आहे.









