केंद्रीय मंत्री शेखावत यांच्यावर केले होते आरोप : 7 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने एका मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. न्यायालयाने त्यांना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावतीने हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर संजीवनी पत सहकारी संस्थेतील घोटाळ्याचा आरोप केला होता. एसओजीच्या तपासात संजीवनी घोटाळ्यातील इतर सहआरोपींप्रमाणेच गजेंद्रसिंह शेखावत यांचाही गुन्हा सिद्ध झाला आहे, असे ते म्हणाले होते. यानंतर शेखावत यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप करत दिल्ली न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात गुऊवारी याप्रकरणी सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समन्स बजावले. त्यांना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजस्थानमधील संजीवनी पत सहकारी संस्थेत सुमारे 1 लाख 46 हजार 993 गुंतवणूकदारांनी 953 कोटी ऊपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचा सहकारी संस्थेने गैरवापर केला. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी विक्रम सिंग इंद्रोईसह अनेक आरोपींना ‘एसओजी’ने अटक केली आहे. संजीवनी व्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने राजस्थानात 211, तर गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 26 शाखा उघडल्या होत्या.









