सिद्धरामय्या, शिवकुमार, सुरजेवाला यांचासह 36 नेत्यांचा समावेश : 27 जुलै रोजी हजर राहण्याचा विशेष न्यायालयाचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह 36 नेत्यांना बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. यापूर्वी राज्य भाजप सरकारविरुद्ध काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी भ्रष्टाचाराचा आरोप करताना काँग्रेसने सरकारविरुद्ध ‘रेट कार्ड’ प्रसिद्ध केले होते. कोणत्या कामांसाठी किती लाच घेतली जाते, याबाबतचा उल्लेख त्यात केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानुसार न्यायालयाने 36 नेत्यांना समन्स बजावले असून 27 जुलै रोजी हजर राहण्याची सूचना दिली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी काँग्रेसने तत्कालिन भाजप विरोधात राज्यव्यापी आंदोलन हाती घेतले होते. सरकारविरोधात काँग्रेसने चक्क ‘रेट कार्ड’ प्रसिद्ध केले होते. आंदोलनावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पोलिसांनी काँग्रेसच्या 36 नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. मंगळवारी सदर प्रकरणासंबंधी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश प्रीत जे. यांनी सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, रणदीप सुरजेवाला यांच्यासह 36 नेत्यांना समन्स जारी केले आहे. तसेच हे प्रकरण सुनावणीसाठी योग्य असल्याचे मतही न्यायालयाने नोंदवून तक्रारदार व साक्षीदारांचे म्हणणे नोंदविण्यासाठी तारीख निश्चित केली आहे.
काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्यांवर दाखल झालेल्या या मानहानी प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने 27 जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे. भाजपच्या वतीने वकील विनोदकुमार यांनी याचिका दाखल करून मानहानीचा दावा दाखल केला होता.
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणासंबंधी तत्कालिन मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. या नेत्यांनी बसवराज बोम्माई यांच्या निवासस्थानासमोरही आंदोलन छेडले होते. त्यामुळे सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह 36 नेत्यांवर बेंगळूरच्या हायग्राऊंड पोलीस स्थानकात भा. दं. वि. च्या सेक्शन 341, 143 आणि केपी अॅक्ट 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणावरील सुनावणी करताना न्यायालयाने 27 जुलै रोजी हजर राहण्याची सूचना समन्सद्वारे केली आहे.
वृत्तपत्रांमध्ये खोटे वृत्त आणि खोट्या आरोपांची जाहीरात प्रसिद्ध केल्याचा ठपका काँग्रेस नेत्यांवर आहे. जनतेला खोटी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि भाजप नेत्यांची नाहक बदनामी झाली आहे, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. भाजपच्या वतीने वकील विवेक सुब्बारे•ाr यांनी युक्तिवाद केला आहे.









