महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात तापमानात लक्षणीय वाढ होणार
वार्ताहर / पुणे
दक्षिण भारत वगळता मध्य, पूर्व, उत्तर भारतात एप्रिल ते जून महिन्यांच्या कालावधीत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, एप्रिलमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने शनिवारी वर्तविली. दरम्यान, सध्या एल-निनोची स्थिती न्यूट्रल असली तरी जून ते सटेंबर या कालावधीत त्याच्यात बदल होण्याचा अंदाज असून, याच्या मान्सूनवरील परिणामावर हवामान विभाग लवकरच भाष्य करेल, असेही हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केले.
हवामान विभागाने शनिवारी पत्रकार परिषद घेत देशातील एप्रिल ते जून या कालावधीतील उन्हाळय़ाचा अंदाज जाहीर
केला. त्यावेळी डॉ. मोहपात्रा बोलत होते.

एप्रिलच्या पहिल्या तसेच दुसऱया आठवडय़ापर्यंत कमाल तापमानात फारसा फरक पडणार नाही. दुसऱया आठवडय़ानंतर मात्र कमाल तापमान देशभरात वाढणार आहे. दक्षिण भारत तसेच वायव्य भारतातील राजस्थान व गुजरातचा काही भाग वगळता देशभरात या तीन महिन्यांच्या कालावधीत वायव्य, उत्तर पश्चिम भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. त्यातही ओडिशा व पश्चिम बंगालच्या तटवर्ती भागात उन्हाचा कडाका जास्त असेल. याबरोबरच वायव्य भारत, उत्तर भारत तसेच पूर्वेकडच्या भागात किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशाला हिट वेव्हचा तडाखा
मध्य भारत, उत्तर भारत व पूर्व भारताच्या बहुतांश भागाला यंदा हीट वेव्हचा तडाखा बसणार आहे. त्यातही उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगडच्या भागात हीट वेव्हची तीव्रता अधिक असेल. याबरोबरच तेलंगणा, आंध्र किनारपट्टी, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या भागालाही पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत हिट वेव्हचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
तळकोकणात यंदा कडक उन्हाळा
एप्रिल महिन्यात दक्षिण भारताचा काही भाग तसेच पूर्वोत्तर भारताचा काही भाग वगळता देशातील इतरत्र भागात कमाल तापमानात वाढ होणार आहे. त्यातही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे. तळकोकणात याचा कडाका अधिक असेल. एप्रिल ते जून महिन्यांचा अंदाज पाहता महाराष्ट्र, गुजरात तसेच कर्नाटक किनारपट्टीवरील कमाल तापमान मोठय़ा प्रमाणात वाढीव राहणार आहे. पूर्व विदर्भाच्या भागातही उन्हाची तीव्रता अधिक असेल, मध्य भारत वगळता महाराष्ट्रात सर्वत्र किमान तापमान सरासरीइतके राहण्याची चिन्हे आहेत.
उत्तर कोकण-मध्य महाराष्ट्रात हीट वेव्ह
आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भाला हीट वेव्हचा तडाखा बसणार आहे. एप्रिल महिन्यात उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण किनारपट्टीला झळा
यंदा कोकण किनारपट्टी, विदर्भात उन्हाच्या झळा तीव्र राहणार आहेत. बाकी राज्यात इतरत्र हवामान सरासरीइतके राहील.
यंदा एल निनोचा धोका?
सध्या एल-निनो न्यूट्रल स्थितीमध्ये आहे. मात्र, मान्सूनच्या सुरुवातीला त्याच्यात बदल होणे अपेक्षित असून, मान्सून कालावधी व त्यानंतरही त्याचा प्रभाव जाणवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भारतीय हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. याचा मान्सूनवरील प्रभाव आपण लवकरच पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देणार आहोत, अशी स्पष्टीकरण डॉ. मोहपात्रा यांनी दिले. दरम्यान, जेव्हा जेव्हा एल-निनोची स्थिती उद्भवली आहे, तेव्हा तेव्हा मान्सूनवर त्याचा परिणाम होऊन मान्सून कमी झाला आहे. यंदाचे वर्ष एल-निनोचे राहणार असल्याची वार्ता आहे. त्यामुळे मान्सूनवर एल-निनोचा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे.









