उन्हाची तमा न बाळगता होतेय कसरत, एकाच दिवशी अनेक विवाह असल्याने पाहुण्यांची धावपळ
प्रतिनिधी / बेळगाव
साधारणत: मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत लग्नसराईचा धुमधडाका सुरू असतो. विशेष म्हणजे मे महिन्यात विवाह मुहूर्त अधिक असतात. त्यामुळे या महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईची धामधूम सुरू असते. दरम्यान मे महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला. आता लग्न सोहळ्यांचा थाटमाट मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. दरम्यान कडक उन्हातही आपले मंगलकार्य आटोपून घेण्यासाठी अनेकांची घाईगडबड सुरू आहे. उन्हाची तमा न बाळगता सध्या लग्नसराईची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
साधारणत: मे महिना हा असंख्य विवाहांनी गजबजला आहे. भरउन्हात घामाच्या धारा सोसत अनेकजण विवाहबद्ध झाले व होणार आहेत. नववधू आणि नववरापेक्षा जास्त त्रास पाहुण्यांचे होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकापेक्षा अधिक विवाहांना उपस्थिती दर्शविण्यासाठी त्यांची तारांबळ उडत आहे. यातच वरांतींच्या गजबजाटामुळे बेळगाव शहराच्या रहदारीवर ताण पडत असतो. मात्र लग्नाला हजेरी लावण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे.
विशेषकरून मे महिन्यामध्ये शाळांना सुटी असते. यातच रविवार सर्वांचा सुटीचा दिवस असल्याने अनेकजण विवाहाचा मुहूर्त पकडण्यासाठी धावाधाव करत असतात. सर्वत्र विवाहांचीच धामधूम पहावयास मिळत आहे. शहरी भागात मंगल कार्यालये तुडुंब गर्दीने भरत आहेत. रणरणते उन, असह्या उकाडा आणि त्यातच गर्दीचे वातावरण अशा परिस्थितीत विवाहवेदीवर चढणाऱ्या मंडळींचेही हाल होतात. पुढे मुहूर्त मिळणार नाहीत म्हणून एकाच दिवशी अधिक जणांनी विवाह ठेवल्याने पाहुण्यांची तारांबळ उडत आहे. यामुळे रस्त्यावर दुपारी 12 ते 3 याकाळात प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
भटजींचीही चांगलीच तारांबळ
विवाहाचे मुहूर्त 12 ते 12.30 च्या दरम्यान असले तरी त्यासाठीच्या वराती मात्र 11 पासूनच सुरू होतात. वाजतगाजत नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या मंडळींनी रस्ते अडविल्याने वाहने खोळंबतानाचे चित्र मे महिन्यात दिसून येत आहे. दुपारी विवाहाचे भोजन उरकून मंडळी बाहेर पडल्याने पुन्हा गर्दीचे वातावरण पहावयास मिळते. विवाहाचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांची घाईगडबड असते. विशेषकरून चांगला मुहूर्त व रविवार पाहून लग्न जुळविणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने वाजपी व लग्न लावणाऱ्या भटजींचीही चांगलीच तारांबळ उडत आहे.
मे महिन्यात यावर्षी लग्नाचे मुहूर्त अधिक आहेत. त्यामुळे मुहूर्त साधण्यासाठी अनेकांची चांगलीच दमछाक उडत आहे. उन्हाच्या झळा सोसतच लग्नसराईचा धुमधडाका उडत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.








