15 एप्रिल ते 15 मे दरम्यान सुटी : किलबिलाट थांबणार
बेळगाव : बालचमूंचा सांभाळ करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना मंगळवार दि. 15 पासून महिनाभर उन्हाळी सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे बालचमूंचा किलबिलाट थांबणार आहे. जिल्ह्यात 5,531 अंगणवाडी केंद्रे आहेत. यामध्ये नवीन लहान-मोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. या सर्व अंगणवाडी केंद्रांना महिनाभर उन्हाळी सुटी दिली जाणार आहे. शहर व ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्रांची संख्या मोठी आहे. काही अंगणवाडी केंद्रे भाडेतत्त्वावर चालतात. या अंगणवाडी केंद्रांमध्ये एक साहाय्यिका व एक मदतनीस आहे. त्याबरोबर केंद्रांमध्ये बालकांची संख्याही टिकून आहे. सरकारी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना यापूर्वीच सुटी पडली आहे. त्याबरोबर आता अंगणवाडी केंद्रांनाही 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान एक महिना उन्हाळी सुटी जाहीर केली आहे. वाढत्या उन्हाने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणीही पालकांनी केली होती. मात्र बेळगाव विभागात कामाच्या वेळेत बदल केला नव्हता. मात्र अंगणवाडी केंद्रांना महिन्याभराची सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महिनाभर अंगणवाडीतील बालकांचा किलबिलाट थांबणार आहे.









