नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पिकाला पसंती : उत्पादन समाधानकारक-योग्य दराचा अभाव
बेळगाव : य् ांदा उन्हाळी भुईमूग पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान काढणीची लगबग सुरू झाली आहे. अलीकडच्या काही वर्षात उन्हाळ्यात भुईमूग आणि इतर पिकांची पेरणी होऊ लागली आहे. केवळ पावसाळ्यात पेरणी न करता आता उन्हाळ्यातदेखील भुईमूगची लागवड केली जात आहे. काढणीला आलेल्या भुईमूगसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. तालुक्यातील अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, हंदिगनूर, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, कल्लेहोळ, कडोली आदी भागात उन्हाळी भुईमूग काढणी सुरू आहे. नैसर्गिक संकटे, वाढती मजुरी आणि इतर खर्चामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे पारंपरिक पिके घेताना फटका बसू लागला आहे. याकरिता काही शेतकरी उन्हाळ्यात पर्यायी पीक म्हणून भुईमूग, रताळी वेल आणि इतर पिकांची शेती करू लागले आहेत. अतिवाड येथील वसंत पाटील या शेतकऱ्याने अर्धा एकर शेतात भुईमूग शेंगांची पेरणी केली आहे. दरम्यान, पोषक वातावरणामुळे पीक सजले आहे. शिवाय काढणीदेखील सुरू केली आहे. एका शेंगांच्या झाडाला अधिक शेंगा लागल्या आहेत. त्यामुळे समाधानकारक उत्पादन झाल्याच्या भावना शेतकरी वसंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मात्र बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने मिळेल त्या दराला भुईमूग शेंगा विकण्याची वेळ आली आहे. वाढते रासायनिक खताचे दर, नैसर्गिक संकटे, विजेचा खेळखंडोबा यामुळे भाजीपाला व अन्य इतर पिके घेणे अशक्य झाले आहे. यासाठी पर्यायी पीक म्हणून भुईमूग शेंगा आणि रताळी वेल लागवड केली आहे. भुईमूग आणि रताळीचे देखील उत्पादन समाधानकारक मिळाले आहे. मात्र एपीएमसीत रताळ्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या दराला रताळी विकण्याची वेळ आली आहे. उत्पादन मिळाले तर दर मिळत नाही आणि दर मिळाला तर उत्पादन होत नाही. हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाबतीत होत असते. त्यामुळेच शेतकरी आर्थिक संकटात सापडतो, अशी भावूक प्रतिक्रिया शेतकरी वसंत पाटील यांनी व्यक्त केली.









