योजनेचे कार्यकारी अभियंता डवरी यांची माहिती
देवराष्ट्रे / वार्ताहर
उन्हाची तीव्रता वाढल्याने तसेच शेतकऱ्यांमधून पाण्याची वाढती मागणी लक्षात घेतापिके सुकू नयेत याची काळजी घेऊन ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन पाच मे रोजी चालू करणार असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
यंदा उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे एप्रिल महिन्यातच मे महिन्याच्या उन्हाच्या झळा लागत असल्याने बागायती पिके कोमेजून गेली आहेत. अनेक ठिकाणी ऊस वाळू लागले आहेत. पंधरा दिवसापूर्वी पाणी बंद होऊन सुद्धा प्रचंड वाढलेल्या उष्णतेमुळे विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. ठिकठिकाणी शेतकरी उन्हाबाबत चिंता व्यक्त करत आहेत आणि पुढचे दोन महिने कसे काढायचे याची त्यांना काळजी लागली आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी ‘तरुण भारत’ ने योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन मे महिन्याच्या पाच तारखेला चालू होणार आहे हे. आवर्तन 15 जून पर्यंत म्हणजे ४०दिवस सुरू राहणार आहे. तसेच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली असल्यामुळे जोपर्यंत त्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत ताकारी योजनेचे आवर्तन बंद केले जाणार नाही. तसेच कोयनेतूनही विसर्जन सुरू करण्यात आले आहे. मे महिन्यातील आवर्तन हे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राजन डवरी यांनी दिली.