भागातील प्रमुख नगदी पीक : यावर्षी लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता : रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान
वार्ताहर/जांबोटी
भातमळणी व इतर सुगीची कामे आटोक्यात आल्यामुळे जांबोटी भागातील शेतकरी वर्गांने आता उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ केला आहे. अनेक गावामधील शेतवडीमध्ये आता शेतकरी मिरची लागवड करताना दिसत आहेत. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, निलावडे, मुगवडे, आंबोळी, आमटे, कालमणी, हब्बनहट्टी, बैलूर, कुसमळी, तोराळी, गोळ्याळी, नेरसा, शिरोली, परिसरातील शेतकरी शेतवडीमध्ये भात कापणीनंतर उन्हाळी मिरची लागवड (गिड्डी मिरची) मोठ्या प्रमाणात करतात. मिरची या भागातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
या पिकासाठी तालुक्याच्या पश्चिम भागात अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकरी भातकापणी व मळणीच्या कामानंतर मलप्रभा नदीकाठ, कारगिळी नाला, भांडुरा, नाला परिसर व उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतवडीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. त्यापासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. यावर्षी सततच्या पावसामुळे सुगीच्या कामांना विलंब झाल्यामुळे मिरची लागवडीला उशीरानेच सुरवात झाली आहे. पूर्वी साधारण जानेवारीमध्ये मिरची लागवड करण्यात येत होती. परंतु मे जून महिन्यात होणाऱ्या पावसामुळे मिरची सुकविण्यासाठी समस्या उद्भवत असल्याने, गेल्या सात-आठ वर्षापासून नोव्हेंबर अखेरपासून या भागात मिरची लागवड करण्यात येत आहे.
मिरचीला गोव्यात मोठ्या प्रमाणात मागणी
खानापूर तालुक्यात उत्पादित केलेल्या उन्हाळी मिरची (गिड्डी मिरची) मध्ये नैसर्गिक तीव्र तिखट गुणधर्म असल्यामुळे गोवा तसेच कोकण किनारपट्टी प्रदेशात या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. एप्रिल महिन्यापासून गावोगावी मिरची व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी दाखल होतात. त्यामुळे मिरची लागवडीपासून शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो. परंतु मिरची पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रोपांची वाढ खुंटने, जंगली प्राण्यांपासून नुकसान, यासारख्या कारणामुळे उत्पादनात घट होते. तसेच एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या वळीव पावसामुळे तोडलेली मिरची सुकवणे अशक्य होत असल्यामुळे मिरची उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो.
दरात घसरण झाल्याचा परिणाम
मागीलवर्षी मिरची खरेदी दरात घसरण झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या भागातील मिरची लागवड क्षेत्रात घट झाली आहे. खरेदी दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. तसेच मिरची विक्रीतून उत्पादन खर्च देखील मिळू शकला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी उत्पादीत केलेली मिरची घरीच साठवून ठेवल्यामुळे यावर्षी मिरची लागवड क्षेत्रात कांही प्रमाणात घट झाली आहे.
मिरचीला हमीभाव जाहीर करण्याची मागणी
मिरचीऐवजी ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. मिरची या भागातील प्रमुख नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळत असल्याने सरकारने मिरची पिकाला हमी भाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









