अध्याय एकविसावा
श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा! वेदांचे भाषण अर्थगांभीर्याने फार खोल असल्यामुळे अत्यंत गहन आहे. त्याविषयी अनेक ऋषींनी पुष्कळ परिश्रम केले तरी त्यांना खरा अर्थ कळला नाही! तेच वेदार्थांचे सार म्हणजे माझे गुप्त ज्ञानभांडार मी तुला सविस्तर सांगितले. देवांचे अध्यायाच्या समारोपाचे बोलणे ऐकल्यावर उद्धव काहीसा नाराज झाला कारण आता या विषयावर देव अधिक बोलणार नाहीत हे त्याच्या लक्षात आले. तो मनात म्हणाला की, देव सांगत असलेले वेदांचे सार कधी संपूच नये असे मला वाटते. वासराचे तोंड लागून गाईला पान्हा फुटला की, धार काढणारा वासराला आखडून ठेवतो, त्याप्रमाणे हा अत्यंत आवडीचा विषय असून देवांनी मध्येच का बंद केला? म्हणून उद्धव मनामध्ये अगदी चरफडू लागला. पक्षिणीच्या पुढे चारा घ्यावा म्हणून पिले जशी चोची पसरतात, त्याप्रमाणे उद्धवही श्रीकृष्णापुढे आ करून बसला. उद्धवाचा हेतु लक्षात घेऊन भगवंत वेदाचा अर्थ सारांशाने सांगत आहेत. अनेक शाखांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असा जो त्रिकांडात्मक वाढलेला वेद, त्यातील साऱया शब्दांमध्ये बोध हाच की, अभेद परमात्मा जो मी, त्या मला हाती धरून श्रुती ह्या तीन कांडांमध्ये चालत आहेत. त्या श्रुत्यातील सारांश मी तुला नीट रीतीने सांगतो ऐक. कर्माच्या आदी, मध्य व अंती मीच, कर्मकर्ता व क्रियाशक्ती मीच, कर्माचे फळ देणारा श्रीपती मीच, हाच काय तो कर्मकांडांतील इत्यर्थ होय. मंत्रमूर्ती आणि मंत्रार्थ तोही खरोखर मीच, पूज्य, पूज्यक व पूज्य ही सारीही मीच, माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. देवानेच देवाची पूजा करावी देव होऊनच देवाला भजावे. वेदातील माझे रहस्य व हेच आगमांनीही सांगितले आहे. मीच देव आणि मीच भक्त, सारे पूजेचे साहित्यही मीच. माझी मीच पूजा करतो. हीच इत्थंभूत ‘उपासना’ होय. वेदाच्या उपासनाकांडातील मुख्य सार ते हेच आगमशास्त्रातील गुप्त भांडार हेच माझ्या भक्तांचे खरोखर वस्तीचे जे घर तीच ही उपासना होय. ‘ज्ञानकांड’ तर फारच विलक्षण आहे. त्यात वेद हा आपला आपणच द्योतक होतो. सारा संसारच जर मुळी काल्पनिक, तर ‘वेद हे नियामक’ असे कोणत्या अर्थान म्हणावे? ओसाड घरात निर्जीव पाहुणा राहावयाला आला, तर त्याचे आदरातिथ्य कोण करणार? तीच दशा वेदाज्ञेची आहे. कळसूत्रातील बाहुली घेऊन तिचे मुंडण केले, तर तिच्या डोक्मयावर पुन्हा काही केस उगवावयाचे नाहीत. त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्ये वेदालाही ठाव नाही. मूळ संसारच जर मायिक, तर त्यातील वेदही तद्रूपच असला पाहिजे. मृगजळामध्ये उदक तर नसतेच पण ओलावासुद्धा असत नाही. जेथे मुळामध्येच मुख्य अद्वैतपणा, तेथे श्रोता-वक्ता कसला? कर्म आणि कर्ता कशाचा? तेथे वेदवार्ता तरी कोठची! जेथे दृश्य, दृष्टा व दर्शन नाही, जेथे ध्येय, ध्याता आणि ध्यान नाही, ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान नाही, तेथे वेदवचन तरी कशाचे? जेथे भ्रमाचे राज्य व भेदाची जाणीव असते, तेथेच वेदाचे शहाणपण आणि उपनिषदांचे गोड गायन चालते. भेद जोपर्यंत प्रबळ आहे, तोपर्यंतच वेदाचे माहात्म्य असते. भेद अक्षतात शिरला की वेदही ‘नेति नेति ’ म्हणत विरून जातो. पाण्याची गार जशी पाण्यातच विरून जाते, त्याप्रमाणे वेदही अद्वैतात मुरून जातो. हेच खरेखरे ज्ञानकांड होय. ज्या अरणीका÷ातून अग्नि स्वतः उत्पन्न होतो, त्या अरणी जाळून टाकूनच तो शांत होतो. याप्रमाणे ज्ञानकांडनिरूपणामध्ये वेदाने आपले आपल्यालाच नाहीसे करून घेतले आहे.
‘अद्वैतरूप ब्रह्म एक आहे’ या श्रुतिवाक्मयानेच द्वैत मिथ्या होऊन जाते. इतके सांगून वेद नाहीसा होतो व ब्रह्म हे पूर्णपणाने सदोदित असते तसेच असते. निर्विकार शुद्ध ब्रह्मात ‘मी ब्रह्म’ अशी स्फूर्ती स्फुरण पावते, तेथेच ओंकाराची उत्पत्ती होते. तो ओंकारही ब्रह्मरूपच आहे. त्याला ‘एकाक्षर ब्रह्म’ असे म्हणतात. त्या ओंकारापासूनच स्वरवर्ण उत्पन्न होऊन श्रुतीच्या मोठमोठय़ा शाखा उत्पन्न झाल्या. ते सारे ब्रह्मरूपच होय. याप्रमाणे सर्व वेद पूर्ण परब्रह्मरूप आहे.
क्रमशः








