वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारताचा टेनिसपटू सुमित नागलने जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानावर असणाऱ्या कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे.
26 वर्षीय नागलने पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश मिळविल्यानंतर पहिल्याच सामन्यात बुबलिकवर 6-4, 6-2, 7-6 (7-5) अशी चुरशीच्या लढतीत मात केली. ही अटीतटीची लढत दोन तास 38 मिनिटे रंगली होती. यापूर्वी 2021 मध्ये नागलला पहिल्या फेरीतच लिथुआनियाच्या रिकार्डस बेरान्किसकडून पराभूत झाला होता. कारकिर्दीत दुसऱ्यांदा तो ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीत खेळणार आहे. 2020 मधील अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याला दुसऱ्या फेरीत डॉमिनिक थिएमकडून पराभव स्वीकारावा लागला होता. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत मानांकित खेळाडूला पराभूत करण्याची भारतीय खेळाडूची ही 35 वर्षांनंतर पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1989 मध्ये रमेश कृष्णनने त्यावेळचा जागतिक अग्रमानांकित व विद्यमान चॅम्पियन मॅट्स विलँडरला धक्का देत खळबळ माजवली होती.
युकी भांब्री-रॉबिन हॅस दुहेरीत पराभूत
भारताचा युकी भांब्री व हॉलंडचा त्याचा जोडीदार रॉबिन हॅस यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. तीन सेट्सच्या अतिशय चुरशीच्या लढतीत कोलंबियाचा निकोलस बॅरीन्टोस व ब्राझीलचा राफेल मॅटोस यांनी त्यांचा 6-1, 6-7 (8-10), 6-7 (7-10) असा पराभव केला. दोन तास 26 मिनिटे ही झुंज रंगली होती. भांब्री-हॅस यांनी पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण नंतरच्या दोन सेट्समध्ये झुंज देऊनही त्यांना हार पत्करावी लागली.









