वृत्तसंस्था / टलन, ऑस्ट्रिया
येथे झालेल्या एटीपी टलन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्याला झेकच्या विट कोप्रिव्हाकडून पराभव पत्करावा लागला.
चॅलेंजर स्तरावरील स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठलेला नागल कोप्रिव्हाकडून 2-6, 4-6 असा पराभूत झाला. जागतिक क्रमवारीत कोप्रिव्हा नागलपेक्षा चार स्थानांनी खाली 194 व्या स्थानावर आहे. पहिल्या सेटमध्ये एका गेममध्ये तो 40-0 असा आघाडीवर होता, तरीही त्याने हा गेम गमविल्यानंतर तो निराश झाला आणि त्याचे सामन्यावरील नियंत्रण सुटले. कोप्रिव्हाने मॅचपॉईंटवर बॅकहँड विजयी फटका मारत सामना संपविला. गेल्या एप्रिलमध्ये नागलने रोम व जुलैमध्ये टॅम्पियर चॅलेंजर स्पर्धेत जेतेपद मिळविले होते.
येथील स्पर्धेत नागलने दोन सीडेड खेळाडूंना हरविण्याचा पराक्रम केला. स्पेनचा अग्रमानांकित अल्बर्ट रॅमोस व्हिनोलसचाही त्यात समावेश आहे. उपविजेतेमुळे सुमितला 60 रेटिंग गुण मिळाले असून एटीपी मानांकनातही तो आता 33 स्थानांची प्रगती करीत 156 व्या स्थानावर पोहोचला आहे. लखनौमध्ये डेव्हिस चषक वर्ल्ड ग्रुप 2 ची लढत मोरोक्कोविरुद्ध होणार असून या लढतीत तो आता सहभागी होणार आहे.









