वृत्तसंस्था/ मेलबर्न
येत्या रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागलने पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवले आहे.
पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळवण्यात येत असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत सुमित नागलने डावखुऱ्या अॅलेक्स मॉक्लेनचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 2 तास चालला होता. भारताच्या सुमित नागलने आपल्या वैयक्तिक अल्पशा टेनिस कारकीर्दीत चौथ्यांदा ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवले आहे. 26 वर्षीय सुमित नागलने 2019 आणि 2020 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम ठेनिस स्पर्धेत तर 2021 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते.









