वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पहिल्याच दिव्यांग क्रीडा पुरस्कारांत पुरूष विभागात सुमित अँटील तर महिलांच्या विभागात शीतल देवी यांना सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून घोषित करण्यात आले.
2020 च्या पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या एफ-64 गटातील भालाफेकमध्ये सुमित अँटीलने सुवर्णपदक मिळविले होते. तर अलिकडेच तिरंदाजपटू शीतल देवीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शीतल देवीने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण मिळविले. सुमितने चीनमधील हाँगझाऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये 73.29 मी.चा विश्वविक्रम नोंदविला होता. तर शीतल देवीने याच स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडा प्रकारात 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकाची कमाई केली.
देशातील विविध क्रीडा फेडरेशनतर्फे दिव्यांग क्रीडापटूंची 23 विभागामध्ये त्यांच्या कामगिरीनुसार या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. एकूण 250 क्रीडापटूंची शिफारस करण्यात आली होती. 1972 च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाईल जलतरण प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळविणारे दिव्यांग जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच चीनमधील पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय अंध बुद्धीबळ संघाने सुवर्ण तसेच अन्य पदके मिळविली असल्याने या संघाला वर्षातील सर्वोत्तम संघाचा मेजर ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशोककुमार ध्यानचंद यांच्या हस्ते या संघाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना यांना सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळाला.









