वृत्तसंस्था / बेंगळूर
शुक्रवारपासून येथील कंटिरेवा स्टेडियमवर सुरू झालेल्या सातव्या इंडिया खुल्या पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्यादिवशी सुमित अॅन्टील आणि प्रिती पाल यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
पुरुषांच्या एफ 12 आणि एफ 64 भालाफेक प्रकारात हरियाणाच्या सुमित अॅन्टीलने 72.25 मी.चा भालाफेक करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात हरियाणाच्या मनजितने 54.56 मी.ची नोंद करत रौप्य पदक तर सेनादलाच्या प्रदीमकुमारने 45.17 मी.चे अंतर नोंदवित कांस्यपदक मिळविले. सुमित अॅन्टीलने दोनवेळा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.
हरियाणाच्या नवदीप सिंगने एफ-40, एफ-41 गटातील भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना 42.63 मी.ची नोंद केली. हरियाणाच्या प्रिन्सने या क्रीडा प्रकारात 31.90 मी.ची नोंद करत रौप्य तर दिल्लीच्या रितेंदर सिंगने 30.85 मी.ची नोंद करत कांस्यपदक मिळविले. उत्तरप्रदेशच्या प्रिती पालने महिलांच्या टी-35, टी-37 आणि टी-42 गटातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 15 सेकंदांचा अवधी घेतला. गुजरातच्या बिनाने 17.20 सेकंदांचा अवधी घेत रौप्य तर हरियाणाच्या अवनीने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या टी-12 व टी-13 गटातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत उत्तरप्रदेशच्या सिमरनने 12.30 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. ओदीशाच्या जानकी ओरमने रौप्य तर गोव्याच्या साक्षी काळेने कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या एफ-56, एफ-57 गटातील गोळाफेक प्रकारात सेनादलाच्या होकातो सीमाने 14.88 मी.ची नोंद करत सुवर्ण, सोमन राणाने रौप्य आणि शुभमने कांस्यपदक घेतले.









