वार्ताहर/ सुळगे (येळ्ळूर)
सुळगे (येळ्ळूर) येथील वार्षिक यात्रोत्सवास सोमवार दि. 15 पासून सुरुवात करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 16 रोजी गावचे आराध्य दैवत श्री भावकेश्वरी देवीच्या इंगळ्या होणार आहेत.
प्रथेप्रमाणे शनिवार दि. 13 रोजी रात्री 11 वाजता पंचकमिटीच्यावतीने गाव शिव बांधली जाते. त्यानंतर सोमवार दि. 15 रोजी पहाटे श्री भावकेश्वरी देवीला अभिषेक घालण्यात येतो. त्यानंतर मंगळवार दि. 16 रोजी सकाळी 9.30 वाजता भावकेश्वरी देवालयासमोर इंगळ्या होणार आहेत. बुधवार दि. 17 रोजी गाव बैठक व तांदुळ, वर्गणी जमा करणे. गुरुवार दि. 18 रोजी चव्हाटदेवी यात्रा, त्या दिवशी दुपारी महाप्रसाद होणार आहे. शुक्रवार दि. 18 रोजी विठलाईदेवी यात्रा होणार आहे. यात्रोत्सव कालावधीत कडक वार पाळण्यात येणार आहे. दरवर्षी ही यात्रा विशेषत: एप्रिल महिन्यातच होते. पण यावर्षी मंदिर नवीन बांधल्यामुळे मंदिर वास्तूशांती, मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळेच यावर्षी यात्रोत्सवाला विलंब झाला आहे. भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे देवस्थान यात्रोत्सव पंचकमिटीने कळविले आहे.









