रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : अपघातांच्या वारंवार घटना : खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील सुळगे (हिं.) गावाशेजारील केंबाळी नाल्याजवळील रस्ता खड्ड्यातच हरवल्याने सदर ठिकाण म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. मोठमोठे खड्डे आणि पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने या खड्ड्यात वाहने अडकून अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. तरी तातडीने सदर खड्डा बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सुळगे गावाशेजारील केंबाळी नाल्याजवळ अर्धा कि. मी. अंतराचा संपूर्ण रस्ता खड्ड्याने व्यापला आहे. जवळपास सहा ते सात फूट लांबीचे आणि चार ते पाच फूट रुंदीचे व अर्धा ते एक फूट खोलीचे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडल्याने यातून वाट शोधताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. सध्या जोरदार पावसामुळे या खड्ड्यातून पाणी साचल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने अडकून अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने सदर खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
सिंधी कॉलनीचे पाणी रस्त्यावर
बेळगाव-वेंगुर्ले हा महामार्ग असल्याने यामार्गे हजारो प्रवासी रोज आपल्या वाहनातून ये-जा करतात. सिंधी कॉलनी ही उंच सुखल भागात असल्याने या भागातून रस्त्याच्या गटारीचे पाणी पूर्णपणे रस्त्यावरती येऊन वाहत असल्याने दुचाकी वाहनचालकांवरती पाणी उडून कुचंबणा होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्याने सदर पाणी थेट रस्त्यावरती येत आहे. ड्रेनेजचे पाणीही रस्त्यावर सातत्याने येत राहते. सार्वजनिक बांधकाम खात्याने किंवा महानगरपालिकेने तातडीने या पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बेळगुंदी फाट्याजवळील खड्डा बनला मृत्यूचा सापळा
बेळगाव-वेंगुर्ली मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीक, गणेश दूध संकलन केंद्राजवळील मुख्य वळणावर जवळपास दहा फूट लांबीचा व तीन ते पाच फूट रुंदीचा व जवळपास एक फूट खोलीच मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक लहान मोठी वाहने खड्ड्यात पडून अपघात घडत आहेत. बेळगुंदी फाट्यावरून येणारी जोरदार वाहने या खड्ड्यात अडकल्याचेही चित्र दिसून येत आहे. यासाठी सदर ख•ा तातडीने बुजवावा, अशी मागणी होत आहे.
आंबेवाडी फाट्यावरील चर धोकादायक
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील आंबेवाडी, मण्णूर फाट्यावरील रस्त्यावर अनेक दिवसापासून चर खणलेली आहे. ती अद्याप योग्यप्रकारे न बुजवल्याने या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांना याचा सातत्याने दणका बसत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने चर बुजवावी, अशी मागणी प्रवाशांतून आहे.









