सार्वजनिक पाटबंधारे खात्याने तातडीने कार्यवाही करण्याची शेतकऱ्यांची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणारी, हजारो एकर शेतीला पाणीपुरवठा करणारी शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या मार्कंडेय नदीने सप्टेंबर महिन्यातच तळ गाठल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा परिणाम शेतातील पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्यावरही होण्याची दाट शक्यता असल्याने सार्वजनिक पाटबंधारे खात्याने तातडीने या नदीच्या पात्रात सुळगा (हिं.)गावानजीक असलेल्या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी या भागातील जनतेतून व शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस झाला. या पावसानंतर राकसकोप धरणातील ज्यादा पाण्याचा साठा मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यात आला. परिणामी या भागात साधारण पूरपरिस्थिती निर्माण झाली. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णत: पावसाने ओढ दिल्याने राकसकोप धरणातील पाणी सोडण्याचे बंद केल्यानंतर व पाऊसच होत नसल्याने मार्कंडेय नदीतील पाणी वाहून गेल्याने कमी झाले आणि सद्यस्थितीमध्ये मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने इथून पुढे शेतकऱ्यांनी पिकाला पाणी कसे द्यावे, या चिंतेने शेतकरीवर्ग अक्षरश: चिंतातूर झाला आहे. सप्टेंबरमध्ये जर नदीचे पात्र कोरडे पडत असेल तर पुढील संपूर्ण वर्ष रब्बी हंगामातील येणाऱ्या विविध भाजीपाला पिकांना पाणी कसे द्यावे, ही मोठी चिंता शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र सध्या नदीच्या पात्रात असलेले पाणीही जर वाहून गेले तर पूर्णत: नदीच कोरडी पडेल. यासाठी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याने तातडीने सुळगा(हिं.) गावानजीक असलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविण्यात यावे, अशी या भागातील शेतकऱ्यांतून मागणी करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांचीही पाणी अडवण्याची मागणी
कंग्राळी बुद्रुक : तालुक्याच्या पश्चिम भागातून वाहणारी व हजारो शेतकऱ्यांची जीवनदायीनी असलेल्या मार्कंडेय नदीवर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेंतर्गत शासकीय निधीतून ठिकठिकाणी घालण्यात आलेल्या बंधाऱ्यांना फळ्या घालून पाणी अडवून जमीन ओलिताखाली आणण्यास सहकार्य करण्याची मागणी करण्यात येत आहे. राकसकोपपासून ते होनगापर्यंत मार्कंडेय नदीकाठ जमीनीमध्ये पावसाळी भात, ऊस पीक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. बंधाऱ्यांना फळ्या घालून पाणी अडविल्यास पाऊस लांबल्यास पिकांना थोडा दिलासा मिळतो. तसेच शिवारातील विहिरीनासुद्धा पाण्याचा पाझर अखेरपर्यंत रहातो. यासाठी शासनाने करोडो रुपये खर्चून सदर योजना सुरू केली आहे. यासाठी नियोजनबद्ध काम होणे गरजेचे आहे. नदीकाठावरील शिवारात मोठ्याप्रमाणात भातरोप लागवड केलेली असल्यामुळे तसेच यावर्षी ऊस लागवडीतसुद्धा वाढ झाल्यामुळे नदीवरील बंधाऱ्यांना फळ्या घालून पाणी अडविल्यास पिकांना जीवदान मिळणार आहे.









