प्रज्ञान रोव्हरने पाठविला विशेष संदेश
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताच्या चांद्रमोहिमेला एक मोठे यश मिळाले आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सल्फर, कॅल्शियम, आयर्न, क्रोमियम, टायटॅनियम, मॅगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा शोध घेतला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध घेतला जात असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सल्फर असल्याची पुष्टी रोव्हरवरील पेलोडच्या माध्यमातून झाली आहे.
इन-सीटू वैज्ञानिक प्रयोग सुरू असून पहिल्यांदाच इन-सीटू मेजरमेंट्सद्वारे रोव्हरवर लावण्यात आलेले उपकरण ‘लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (एसआयबीएस)’ स्पष्ट स्वरुपात दक्षिण ध्रूवाजनीक चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची पुष्टी करते. अपेक्षेनुसार एआय, सीए, एफई, सीआर, टीआय, एमएन, एसआय आणि ओ चा शोध लागला असल्याचे इस्रोने स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. एलआयबीएस नावाचा हा पेलोड बेंगळूर येथील इस्रोची प्रयोगशाळा इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टीम्समध्ये विकसित करण्यात आले आहे.
चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरसोबत गेलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील स्वत:ची स्थिती सांगितली आहे. प्रज्ञान रोव्हरने एक विशेष संदेश पाठविला असून यात त्याने पृथ्वीवासीयांची विचारपूसही केली आहे. मी अणि माझा मित्र विक्रम लँडर संपर्कात असून दोघांचेही आरोग्य उत्तम असल्याचे म्हणत प्रज्ञान रोव्हरने स्वत:च्या संदेशात लवकरच चांद्रमोहिमेचा सर्वात चांगला परिणाम सर्वांसमोर येणार असल्याचे नमूद केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) वर एलव्हीएम3-एम4/चांद्रयान-3 मिशन नावाने अकौंट सुरू करण्यात आले असून यात प्रज्ञान रोव्हरचा संदेश पोस्ट करण्यात आला आहे. ‘हॅलो पृथ्वीवासीयांनो! मी चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर, तुम्ही सर्व उत्तम असाल अशी आशा करतो. चंद्रावरील रहस्यांची उकल करण्याच्या दिशेने मी वाटचाल करत आहे. मी आणि माझा मित्र विक्रम लँडर संपर्कात असून आमचे आरोग्य चांगले आहे. सर्वात चांगला परिणाम लवकरच समोर येईल’ असे या संदेशात म्हटले गेले आहे.
चांद्रयान-3 मोहिमेचे आयुर्मान एका चंद्रदिनाइतके मानले जात आहे. एक चंद्रदिन पृथ्वीवरील 14 दिवसांइतका असतो. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. अशाप्रकारे चांद्रयान-3 ने चंद्रावरील सुमारे अर्धा दिवस पूर्ण केला आहे. यादरम्यान इस्रोने लँडर आणि रोव्हरच्या मदतीने चंद्राविषयी महत्त्वपूर्ण माहिती जमविली आहे.
चांद्रयान-3 आणखी एक चंद्रदिनापर्यंत काम करू शकतो अशी अपेक्षा इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्यासह अनेक भारतीय वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. याकरता चांद्रयान-3 ला चंद्रावरील अत्यंत थंड हवामानात टिकून रहावे लागणार आहे. चंद्रावरील काही हिस्स्यांमध्ये तापमान उणे 203 अंश सेल्सिअसपर्यंत खालावत असते.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून चांद्रमोहिमेसंबंधी प्रस्ताव संमत
केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-3 मोहिमेच्या अंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचे कौतुक करत मंगळवारी एक प्रस्ताव संमत केला आहे. या मोहिमेचे यश अंतराळक्षेत्रात भारताच्या वैज्ञानिक कामगिरीपेक्षा अधिक देशाची अत्याधुनिक मानसिकता, आत्मनिर्भरता आणि जागतिक व्यासपीठांवर उभरत्या ‘नव्या भारता’चे प्रतीक असल्याचे प्रस्तावात म्हटले गेले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताच्या मोठ्या कामगिरीवर इस्रो अन् वैज्ञानिकांचे कौतुक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.









