मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : संगीत कलेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व
बेळगाव : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कुमार गंधर्व यांचे जन्मस्थळ सुळेभावी येथे संगीत शाळा सुरू झाली असून ही आनंदाची बाब आहे. संगीत शाळा या भागातील मुलांना प्रेरणादायी ठरो, या भागातून अनेक कलाकार घडोत, अशी सदिच्छा महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. मुरकुंबी इतिहास उपक्रमांतर्गत सोमवारी सुळेभावी येथे कुमार गंधर्व संगीत शाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. संगीत कलेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत कला अनेक व्याधींवर गुणकारी ठरते. आज अनेक रुग्णालयांतून म्युझिक थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात येत असतात. यावरून संगीतकलेची महती समजून येते, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर विदुषी कलापिनी कोमकली, भुवेश कोमकली यांच्या हस्ते संगीत शाळेचे उद्घाटन झाले. मुरकुंबी इतिहास उपक्रमाच्या अध्यक्षा डॉ. विद्या मुरकुंबी अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाला महेश सुगनेण्णवर, देवण्णा बंगेनवर, बसनगौडा हुंकरी-पाटील, शिवाजी हुंकरी-पाटील, फकिरव्वा अमरापूर, इस्माईल तिगडी यांसह मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे सदस्य उपस्थित होते.









