वार्ताहर/सांबरा
सुळेभावी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दि. 18 रोजी उत्साहात प्रारंभ झाला आहे. पाच वर्षानंतर होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी गावांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवार दि. 18 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास गावातील बडीगेर यांच्या निवासस्थानासमोर देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर व्हन्नाट कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर देवीचा व्हन्नाट कार्यक्रम झाला. रात्री देवी गदगेवर विराजमान झाली. नऊ दिवस होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त गावामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमिटीने सर्व ती खबरदारी घेतली आहे.सुळेभावीला येणाऱ्या भाविकांनी बेळगाव-सांबरा रोड तसेच कणबर्गी मार्गेही असलेल्या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे









