प्रतिनिधी/ बेळगाव
सुळेभावी (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार दि. 9 मार्च रोजी सकाळी सुळेभावीहून बेळगावपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 26 मार्चपर्यंत देवीची यात्रा भरणार आहे.
रविवारी सकाळी 9 वाजता महालक्ष्मी देवीचे पूजन करून मंदिरासमोरून बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. खणगाव बी. के., अष्टे, कणबर्गीमार्गे ही रॅली बेळगावला पोहोचणार आहे. राणी चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौकपर्यंत ही रॅली चालणार आहे. तेथून सांबरामार्गे पुन्हा सुळेभावीला जाऊन बाईक रॅलीची सांगता होणार आहे. श्री महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटी, पुजारी, ग्राम पंचायत व गावकऱ्यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सुळेभावी, यद्दलभावीहट्टी, चंदूरसह परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत. सुळेभावीत यात्रोत्सवाची तयारी करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून बाईक रॅली होणार आहे.









