ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस नेते सुखविंदरसिंह सुक्खू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी आज हिमाचल प्रदेशचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी दोघांना शपथ दिली. या शपथविधी सोहळय़ाला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
सुखविंदरसिंह सुक्खू हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआयचे अध्यक्ष, शिमला येथील एमसीचे दोन वेळा नगरसेवक, युवक काँग्रेसचे प्रमुख आणि 2022 मध्ये निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. प्रेमकुमार धुमल यांच्यानंतर मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते हमीरपूर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत.
हिमाचल विधानसभा निवडणुकीत एकूण 68 पैकी 40 जागा जिंकून काँग्रेसने भाजपला सत्तेतून बाहेर काढले आहे. शिमला येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुक्खू यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांची मुख्यमंत्री म्हणून औपचारीकपणे घोषणा करण्यात आली होती.