उपमुख्यमंत्रीपदी मुकेश अग्निहोत्री ः राहुल-प्रियांका गांधींची सोहळय़ाला उपस्थिती
शिमला / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुक्खू यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुक्खू यांच्यासोबतच मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रविवारी दुपारी शिमलामधील रिज मैदानात दुपारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी दोघांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
हिमाचलमध्ये रविवारी झालेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळय़ाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, हिमाचल प्रदेशचे सर्व आमदार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा आणि हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलटही शपथविधी सोहळय़ाला पोहोचले होते.
काँगेस नेत्यांमध्ये दिसले ऐक्य
मुख्यमंत्री निवडीदरम्यान गेल्या दोन दिवसात काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच दिसली तरी शपथविधी सोहळय़ात मात्र एकीचे दर्शन दिसून आले. शपथविधी सोहळय़ावेळी मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असलेल्या प्रतिभा सिंह यांना प्रियांकाने आपल्या शेजारी बसवले. सुक्खू यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांसह मंचावरून समर्थकांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी सकाळी सुक्खू यांनी शपथविधीसाठी निमंत्रित करण्यासाठी स्वतः प्रतिभा सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘पक्ष आधी, मुख्यमंत्री नंतर’ असे वक्तव्य करत प्रतिभा सिंह आपल्या आदर्श असल्याचे सांगितले होते.
राहुल, प्रियांका गांधींची व्यासपीठावर चमक
हिमाचलचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या आई संसार देवी यांनीही शपथविधी सोहळय़ाला हजेरी लावली. त्या व्यासपीठासमोर बसल्याचे राहुल गांधींना समजताच त्यांनी संसारदेवी यांना व्यासपीठावर बोलावून त्यांची गळाभेट घेतली. प्रियांका गांधी यांनीही सुक्खू यांच्या आईला आलिंगन देत मंचावर बसवले.
आता मंत्रिपदांसाठी रस्सीखेच
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्ता राखण्यात अपयश आल्याने पाच वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. आता मुख्यमंत्रीपदाची कमान सुक्खू यांच्या खांद्दय़ावर दिल्यानंतर मंत्रिमंडळात आपापल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी कसरत सुरू होणार आहे. राज्यात प्रतिभा सिंह आणि सुक्खू असे दोन गट असून प्रत्येकजण आपापल्या समर्थकांना दर्जेदार खाती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य यांना मंत्रीपद मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.









