बिनविरोध निवड निश्चित. आज विशेष बैठकीत अधिकृत घोषणा. मुख्यमंत्र्यांकडून मगोच्या दोन्ही नगरसेविकेंचे स्वागत.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत नगरसेविका सुखदा कमलाकर तेली यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध या पदावर निवड झाली आहे. आज शुक्र. दि. 1 जुलै रोजी होणाऱया विशेष बैठकीत निवडणूक अधिकाऱयांकडून अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान भाजपला पाठिंबा दिलेल्या मगोच्या दोन्ही नगरसेविकांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप पालिका मंडळात स्वागत केले.
डिचोली नगरपालिकेच्या राजकीय सत्तानाटय़ात विविध घडामोडी घडल्यानंतर अखेर भाजप गटातर्फे आठ जणांच्या गटानिशी नगरसेविका सुखदा तेली यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. विरोधात असलेल्या सहा जणांच्या गटाकडून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने अखेर सुखदा तेली यांची बिनविरोध निवड या पदासाठी झाली आहे.
या नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा तनुजा गावकर यांच्या राजिनाम्यानंतर हे पद रिक्त होते. सत्ताधारी गटात आता नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह नगरसेवक विजयकुमार नाटेकर, निलेश टोपले, अनिकेत चणेकर, दिपा पळ, सुदन गोवेकर, अँड. रंजना वायंगणकर व सुखदा तेली यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मगोच्या नगरसेविकांचे स्वागत
या पालिकेच्या सत्तानाटय़ात भाजपचे सहा व मगोचे दोन नगरसेवक घेऊन आठ जणांचा नवीन गट स्थापन करण्यात आला. यात मागील मंडळात असलेल्या दहाजणांपैकी चार नगरसेवकांना बाहेर ठेवण्यात आले आहेत. या आठ जणांच्या गटाने काल गुरू. दि. 30 जुन रोजी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची साखळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सर्व चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मगोच्या नगरसेविका सुखदा तेली व अँड. रंजना वायंगणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजप पालिका मंडळात स्वागत केले. व डिचोली नगरपालिकेला आपले सर्वतोपरी सहकार्य असल्याचे सांगितले.









