लगोरी, लपाछपी, तळ्dयातमळ्dयात, टिक्करबिल्ला यांसारखे लहान मुलांचे खेळ काळाच्या ओघात जसे हरवून गेले तशा लहान मुलांना चुकांबद्दल होणाऱ्या लहानमोठ्या शिक्षाही काळाच्या पोटात लुप्त झाल्या. कान धरून कोपऱ्यात उभी राहणारी आज्ञाधारक मुले एका पिढीने बघितली आहेत. गृहपाठ केला नाही की कान धरून उठाबशा काढणे किंवा कान पकडून बेंचवर उभे राहणे ही सर्वमान्य शिक्षा शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना करत असत. काही अपराध झाला तर क्षमेसाठी कानाला हात लावण्याची पद्धत आजही रूढ आहे. कानपिळी ही देखील एक शिक्षा पूर्वी प्रचलित होती. मोठ्या माणसांचे परंपरेचे बोल कानावर न घेता कानाबाहेर ठेवले की हमखास ही शिक्षा होत असे. सृष्टीमधल्या प्रत्येक जिवाला कान हे इंद्रिय परमेश्वराने बहाल केले आहे. फक्त आकार वेगवेगळा आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे मस्तक हत्तीचे आहे. हत्तीचे कान सुपासारखे असतात. पू. पांडुरंग शास्त्राr आठवले म्हणतात, ‘सुपासारख्या कानांची शिकवण आहे की बोलणे सर्वांचे ऐकावे, पण त्यातले सार ग्रहण करून बाकीच्या तत्त्व नसलेल्या गोष्टी सोडून द्याव्यात.’ कुत्र्याच्या कानाची श्रवणशक्ती प्रचंड आहे. दीडशे फुटांवर जर मालकाच्या गाडीचा
हॉर्न वाजला तर कुत्रा कान टवकारून शेपूट हलवत आनंद व्यक्त करतो. इतक्या दूरवरचे त्याला ऐकू येते. सशाचे कान अतिसंवेदनशील असतात. एखाद्या व्यक्तीला सापाच्या कानाचा असे म्हणतात. वास्तविक सापाला कान हे दृश्य इंद्रिय नाही. आता संशोधनाने सिद्ध झाले आहे की सापाच्या सर्वांगाला ध्वनिकंपने जाणवतात. सापाचा संपूर्ण देह म्हणजे कान आहे. सर्वांगाचे कान करून ऐकावे हा गुण सापाकडून घ्यावा.
संत तुकाराम महाराज कानांना विनवणी करतात, ‘तुम्ही आईकारे कान । माझ्या विठोबाचे गुण?’ कान या इंद्रियाला उपदेश करताना महाराज म्हणतात, ‘जिवाचे कान करून जर तुम्ही विठोबाचे गुण ऐकाल तर शब्दांशिवाय निसर्गात असलेले मधुर अमृतमय संगीत तुम्ही ऐकू शकाल.’ श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीतली पहिली पायरी आहे आणि तिचे साधन कान हे इंद्रिय आहे. डोळे जसे बंद करता येतात तसे कान बंद करण्याची सोय परमेश्वराने केली नाही. कानावर हात ठेवता येतात किंवा कानात बोटे घालता येतात. कान हलवताही येत नाही. स्थूल देहातील कानाची कोणतीही हालचाल करता येत नसली तरी माणसाचा सूक्ष्मदेह कानांवर नियंत्रण ठेवू शकतो. श्रवण हे जर अनन्यशरण भक्तीमध्ये परावर्तित झाले तर कान हे इंद्रिय महाद्वार होऊ शकते. महाद्वार कुठे असते? देऊळ, राऊळ, राजवाडे, राजपत्रित अधिकारी, संस्थाने इथे महाद्वारे असतात. तिथे सहज प्रवेश मिळत नाही. त्यासाठी ओळखपत्र लागते. मात्र अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी महाद्वारे आपणहून उघडतात.
कानावर जर मनाचे पहारेकरी नियुक्त केले तर चुगल्याचहाड्या, निंदानालस्ती, वायफळ गप्पा यांना कानात शिरकाव करताच येणार नाही. त्यांना या पहारेकऱ्यांचे भय वाटेल. प्रवचने, कथा, कीर्तन, नामस्मरण हे थेट आत जाऊ शकतील. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘श्रवणासी श्रवण भूषण’. कवचकुंडले हे कानाचे भूषण नसून श्रवणाला महत्त्व आहे. मांजर जशी आपल्या भक्ष्यावर, दुधाच्या भांड्यावर, ते कधी मिळेल म्हणून टपून बसली असते, तसे साधकाने मन समृद्ध आणि उन्नत होईल अशा श्रवणासाठी उत्साही व तत्पर असले पाहिजे.
श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये ‘विश्वामित्र प्रिय: श्रुती’ असे म्हटले आहे. विश्वामित्र ऋषींनी राक्षसांपासून ऋषीमुनींचे, त्यांच्या यज्ञाचे रक्षण व्हावे म्हणून श्रीरामांना आपल्याबरोबर नेले तेव्हा ते वाटेमध्ये श्रीरामांना वेद, उपनिषदे, शास्त्रs यांबद्दल सखोल ज्ञान देत असत. श्रीराम प्रभूंची अनन्यशरण श्रवणभक्ती बघून विश्वामित्र ऋषींनी त्यांना वर दिला की श्रीरामांना यापुढे ज्ञानग्रहण करताना कधीही तहानभुकेची बाधा होणार नाही. श्रीरामांची प्रार्थना केली की श्रवणभक्तीमध्ये अडसर उत्पन्न होत नाही. कान या इंद्रियाला अध्यात्मसाधनेत फार जपावे लागते व सावधही असावे लागते. मनामध्ये ज्याचे चिंतन सुरू असते त्याप्रमाणे कान श्रवण करतात व सांगणाऱ्याचे बोल वळवून घेतात. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे…
देखोनी पुराणिकाची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी। प्रेम खरे दिसे जना । भिन्न अंतरी भावना ? – एका देवळामध्ये लांब पांढरी दाढी असलेले वृद्ध पुराणिकबुवा पुराण सांगत असत. तिथे एक धनगर येऊन बसे. पुराणिकबुवा पुराण सांगायला लागले की तो रडत असे. अधुनमधून हुंदके देत नाक चोळत असे. सगळ्या श्रोत्यांना आणि पुराणिकबुवांनाही वाटायचे की पुराण ऐकून या धनगराचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. परंतु ते खरे नव्हते. त्याचे आवडते एकुलतेएक बोकड नुकतेच मेले होते. त्याच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नसत. पुराणिकबुवांची हलणारी दाढी बघून त्याला बोकडाची तीव्र आठवण होई. बुवांनी प्रकृती-पुरुष याविषयी दोन बोटे दाखवून सांगितले की तो म्हणायचा, बरोबर आहे. त्याला दोन शिंगे होती. चार पुरुषार्थ-चार आश्रम ते सांगू लागले की धनगर म्हणायचा, होय बरोबर. त्याला चार पाय होते. तुम्ही बरोबर खुणा सांगता. मेलेला बोकड त्याच्या मनात तसाच जिवंत असल्यामुळे त्याचे कान त्याच्या मनाला हवे तसे ऐकत होते.
श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील पहिली ओवी अशी आहे-
तरी अवधान एकले दीजे । मग सर्व सुखाची पात्र होईजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे। उघड ऐका ?
तुम्ही एकदा माझ्याकडे कान लावा. तुम्हाला सर्व सुखे प्राप्त होतील. जेव्हा भगवंतांनी ज्ञानाचा महिमा वर्णन केला तेव्हा अर्जुनाची स्थिती कशी झाली? माऊली म्हणतात, तव तया जाले आन । सर्वांगी निघाले कान । सपाई अवधान । आतला पां? अर्जुनाच्या सर्वांगाला कान फुटले. फार काय सांगावे? तो अवधानाची मूर्तीच बनला. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. र. ना. शुक्ल यांनी म्हटले आहे की माऊलींच्या समाधीजवळ असणारे आळंदीचे वृक्ष बोलतात. वृक्षांचे हे बोलणे ज्यांच्या कानाची आंतरशक्ती जागृत झालेली असते त्यांनाच ऐकू येते. माऊलींजवळ असणारे अजानवृक्ष आणि पिंपळवृक्ष हे वृक्ष ठराविक वेळी, ठराविक लोकांशी, ठराविक काळी आजही बोलतात.
कानगोष्टी नावाचा एक खेळ आहे. वर्तुळात बसलेल्या एकाने दुसऱ्याच्या कानात एक गोष्ट सांगायची. ती पुढे कानाकानांतून पसरत जाते. शेवटचा जेव्हा ती गोष्ट सांगतो तेव्हा पहिल्याने सांगितलेल्या गोष्टीचा मागमूसही त्या गोष्टीत नसतो. माणसाच्या आयुष्यातही खूपदा असे घडते. त्यामुळे जीवनाची घडी विस्कटते. माणसाचे कान हे सापाचे बीळ असू नये. अन्यथा कुणीही गरळ ओकावे आणि सारे आयुष्यच विषारी होऊन जावे. भिंतीलाही कान असतात असे म्हणतात. घरातल्या भिंती वाणीच्या माध्यमातून सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा ग्रहण करत असतात. ज्या घरात अग्निहोत्र, स्तोत्रपठण, मंत्रजागर असतो तिथे काही काळ मनुष्य स्थिरावतो. संतांच्या घरात, साधनाकक्षात, गुहेत मंत्रांची स्पंदने भरलेली असतात. उच्च अवस्थेला पोहोचलेल्या साधकाच्या कानांची क्षमता त्या मंत्रांची स्पंदने खेचून घेतात.
शांतिपाठात ‘भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम् देवा’ अशी प्रार्थना आहे. तिचा अर्थ असा की आमच्या कानांवर नेहमी मंगलध्वनी पडावेत ही त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
-स्नेहा शिनखेडे








