आंतरजातीय विवाहाला समाजमान्यता मिळणार नसल्याच्या भावनेने दिला जीव
सोलापूर / प्रतिनिधी
आंतरजातीय विवाह समाजाकडून स्वीकारला जाणार नाही, या भितीने उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गावात प्रेमीयुगुलाने एकत्र गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विवाहासंदर्भांत त्यांनी एकमेकांच्या कुटुंबीयांशी कोणतीही चर्चा केली नसल्याची बाब तपासात समोर आली आहे.
वाजिद चांद इनामदार (वय 24, रा. बीबीदारफळ ता. उ. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11.30 ते 1 च्या दरम्यान घडली. बीबीदारफळ गावात शाळेत असल्यापासून वाजिद आणि अल्पवयीन तरुणी एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यातील संवादातूनच त्याचे एकमेकांवर प्रेम जडले. परंतु याची कोणाकडेही वाच्यता केली नव्हती. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी वाजिदचा विवाह दुसऱया मुलीबरोबर पार पडला. तेव्हापासून आपण एकमेकांपासून आता कायमचे दूर जाणार या भीतीने त्यांच्या मनात भीतीने घर केले होते. विवाह झाला तरी वाजिद आणि त्याच्या प्रेयसीच्या मनात एकत्र येण्याचे विचार सुरूच होते. परंतु समाज आपले लग्न स्विकारणार का? या भीतीने त्या दोघांचेही मनस्वास्थ हरवले होते. एकत्र राहू शकत नाही तर एकत्र मृत्यूला तरी कवटाळू शकतो अशी त्यांनी मनधारणा केली.
सोमवारी सायंकाळी वाजिदच्या घरात आईच्या निधनानंतरचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जिकडे-तिकडे गेले. रात्री साधारण 11.30 च्या सुमारास अल्पवयीन तरुणी वाजिदच्या घरात गेली. यानंतर दोघांनी एकत्र गळफास घेत जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत ‘आमचं प्रेम समाजाला मान्य असणार नाही, आमच्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये’ असा मजकूर चिठ्ठीत लिहला असून ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान वाजिदचे शिक्षण होऊन तो मजुरीचे काम करीत होता. तर अल्पवयीन तरुणी विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी वाजिदच्या पत्नीला वाजिदच्या प्रेमसंबंधाविषयी संशय आला होता. यातून त्या माहेरी निघून गेल्या होत्या. वाजिदच्या पश्चात वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.
बाय..बाय लाईफ
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी वाजिदने त्याच्या मोबाईलच्या स्टेटसवर बाय..बाय लाईफ असा मजकूर लिहला होता. तो त्याच्या भावाने पाहिला. त्यावेळी साधारण रात्रीचे 11.30 वाजले होते. वाजिदच्या भावाने फोन घरातील लोकांना स्टेटसबाबत सांगितले, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.









