प्रतिनिधी/ बेळगाव
केदनूर (ता. बेळगाव) येथील एका मूर्तिकाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी आंबेवाडीजवळील शेतवडीत उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
लक्ष्मण मारुती लोहार (वय 40) असे त्या दुर्दैवी मूर्तिकाराचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मण गणेशमूर्ती साकारत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ-बहीण असा परिवार आहे. आंबेवाडीहून कडोलीला जाणाऱ्या रस्त्याशेजारील शेतवडीतील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लक्ष्मणने नवे घरबांधकामही सुरू केले होते. नेमक्या कोणत्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली, याचा उलगडा झाला नाही. काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. पुढील तपास करीत आहेत.









