आटपाडी :
अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संतापजनक प्रकार आटपाडी तालुक्यात घडला. या प्रकरणी करगणीतील तिघे आणि बनपुरीतील एक अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या दोघा नराधमांची लोकांनी चांगलीच धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. सोमवारी पूर्ण रात्र आणि मंगळवारी दिवसभर कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी आटपाडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आक्रमक पवित्रा घेतला.
शारीरिक, मानसिक त्रास देवून दहावीच्या शाळकरी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात (तिघेही रा.करगणी) आणि अनिल नाना काळे (रा.बनपुरी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोषी आरोपींवर पोक्सोतंर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न झाल्याने मंगळवारीही नातेवाईक, ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीने रविवारी रात्री घरी जेवण करत असताना घडलेला प्रकार सांगितला. राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, अनिल काळे हे शाळेला जाताना शारीरिक सुखासाठी त्रास देत होते. ही मागणी तिने सातत्याने धुडकावून लावली. एकेदिवशी एका बँक शाखेच्या इमारतीवरील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
यातील एकाने त्या कृत्याचे व्हिडीओ काढले. व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देवून चौघांकडून सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचे पिडीत मुलीने वडिलांना सांगितले. हा त्रास सहन न झाल्याने पिडीत शाळकरी मुलीने राहत्या घरात सोमवारी सकाळी साडेसहापूर्वी गळफास घेवून आपले जीवन संपविल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, निरीक्षक विनय बहिर यांच्यासह पोलिसांवर गंभीर आरोप करत पोक्सो, बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चौघांवर दाखल करण्याची मागणी लोकांनी केली. सोमवारी रात्रभर आक्रमक नातेवाईक, ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात टाहो फोडला. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही लोकांनी केला. अखेर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चौघांवर दाखल झाला.
मंगळवारी सकाळी पुन्हा करगणीकरांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करता फक्त आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करत आक्रमक भुमिका घेतली. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर बसून घोषणाबाजी केली. मयत पीडितेच्या बहिणीसह नातेवाईकांचा जबाब घेवून आरोपींवर कलम वाढविण्याची ग्वाही पोलिसांनी दिल्यानंतर वातावरण काही प्रमाणात शांत झाले.
- करगणीत कडकडीत बंद
दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली. त्यातच लैंगिक अत्याचार, अश्लिल चित्रफीतचा संशय व्यक्त झाल्याने संतापात भर पडली. मंगळवारी या घटनेचा निषेध म्हणून करगणी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
- अत्याचाराचे मोठे कांड?
दोषींनी केलेले लैंगिक अत्याचाराचे कांड मोठे आहे. बेकरीसह करगणीतील बसस्टॅण्ड हटविण्याची मागणी जमावाकडून करण्यात आली. नराधमांनी अनेक मुलींना ब्लॅकमेल करून अशा प्रकारे अत्याचार व व्हिडीओ क्लिप बनविल्याचा आरोप ग्रामस्थांसह नातेवाईकांनी केला. शाळा, कॉलेजसह अनेक महिलांच्या बाबतीत बेकरीआडून हे कृत्य झाले आहे. यामध्ये राजू गेंड हा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर केला.








