पुणे / प्रतिनिधी :
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.
सुनील नारायण शिंदे (वय 48, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सुनील शिंदे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी माळवाडी भागात मागील काही वर्षापासून कुटुंबासोबत राहत आहेत. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा हा वडील अजून झोपेतून का उठले नाही, हे पाहण्यासाठी त्यांच्या खोलीजवळ गेला. मात्र, त्याने आवाज देऊनही खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून पाहिले असता वडील खोलीतील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यास धक्का बसला. ही बाब त्याने कुटुंबियांना सांगितल्यानंतर यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी सुनील शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म 17 भरण्याची सुविधा उद्यापासून









