वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्ताचा गाजलेला स्नूकरपटू माजिद अली याने आत्महत्या केली आहे. तो 28 वर्षांचा होता. त्याने 21 वर्षांखालील आशियायी स्नूकर स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. त्याला नैराश्याने घेतले होते. याच नैराश्याचा झटक्यात त्याने आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. त्याने लाकूड कापण्याच्या यंत्राने आत्महत्या केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती देण्यात आली.
गेल्या एक महिन्यात मृत्यू झालेला हा पाकिस्तानचा दुसरा स्नूकरपटू आहे. मेमध्ये पाकिस्तानचा दोनदा राष्ट्रीय विजेता असणाऱ्या मोहम्मद बिलाल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तो 38 वर्षांचा होता. अल्पावधीत झालेल्या मृत्यूंमुळे पाकिस्तानच्या स्नूकर क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया तेथील क्रिडापटू आणि स्नूकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.









