आत्महत्या देशद्रोह असल्याची हुकुमशहाची टिप्पणी : उपासमारीमुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये 40 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आत्महत्येचे लोण पाहता हुकुमशहा किम जोंग उन यांनी एक गुप्त आदेश जारी करत आत्महत्येवरच बंदी घातली आहे. आत्महत्येला त्यांनी देशद्रोह ठरविले आहे. या आदेशात अधिकाऱ्यांना आत्महत्या रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर कोरियात एक जरी आत्महत्या झाली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.
उत्तर कोरियात मे महिन्यांपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत आत्महत्येच्या घटना 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चोंगजिन प्रांतात चालू वर्षात आत्महत्येच्या 35 घटना उघडकीस आल्या आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये पूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्या आहेत. लोकांनी सुसाइड नोटमध्ये उत्तर कोरियामधील सामाजिक व्यवस्थेला जबाबदार ठरविले आहे. वाढती गरीबी आणि बेरोजगारी हे आत्महत्यांमागील महत्त्वाचे कारण आहे.
हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार उत्तर कोरियात दर 1 लाख लोकांमागे 8 हून अधिक आत्महत्या घडल्या आहेत. परंतु किम जोंग उन यांच्या शासनाने अद्याप आत्महत्येच्या घटनांचा अधिकृत डाटा जारी केलेला नाही. किम यांच्या देशात हिंसक गुन्ह्यांचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. आत्महत्यांचे प्रमाण रोखण्याकरता हुकुमशहा किम यांनी एक तातडीची बैठक बोलाविली होती. देश आणि सामाजिक व्यवस्थेवर टीका करणाऱ्या सुसाइड नोटच्या खुलाशामुळे किम संतप्त झाले आहेत.
हॉलिवूडपट पाहिल्यास शिक्षा
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम हे स्वत:च्या अजब निर्णयांसाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी हुकुमशहाने देशातील मुलांना हॉलिवूड चित्रपट तसेच सीरिज पाहण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास मुलांसोबत त्यांच्या आईवडिलांनाही शिक्षा ठोठावण्यात ये आहे. 6 डिसेंबर रोजी उत्तर कोरियात माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या 2 मुलांना मृत्युदंड देण्यात आला होता. दोन्ही विद्यार्थ्यांचे वय 15-16 वर्षांदरम्यान होते. त्यांना जमावासमोर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या मित्रांना अनेक कोरियन सीरिज पुरविल्या होत्या. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात तणाव आहे. यामुळे उत्तर कोरियातील लोकांना दक्षिण कोरियात निर्मित शो आणि चित्रपट पाहता येत नाहीत.









