कुरियरने आलेल्या डेथनोटमध्ये दिले कारण : दोन मुलांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
बेळगाव : अनिवासी भारतीय महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले असून ऑस्ट्रेलियात स्थानिक पोलीस व काही अनिवासी भारतीयांनी दिलेल्या जाचामुळे या महिलेवर आत्महत्येची वेळ आली होती. प्रियदर्शिनी लिंगराज पाटील (वय 40) मूळची रा. सप्तापूर, धारवाड असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गेल्या सोमवार दि. 21 रोजी मलप्रभा नदी पात्रात उडी टाकून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. सौंदत्ती तालुक्यातील गुरवनकोळ्ळजवळ ही घटना घडली होती. मुलाच्या आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार 19 ऑगस्ट रोजी प्रियदर्शिनी ऑस्ट्रेलियाहून बेंगळूरला आली. त्यानंतर सप्तापूर येथील आपल्या माहेरी येण्याचे सांगितले होते. मात्र, माहेरी न जाता नविलतीर्थ धरणातील बॅकवॉटरमध्ये तिने आत्महत्या केल्याचे आढळले. प्रियदर्शिनीने आपली बॅग व डेथनोट वडिलांना कुरियरने पाठविले होते. तेरा वर्षांपासून प्रियदर्शिनी व तिचे पती लिंगराज ऑस्ट्रेलियात होते.
प्रियदर्शिनीचा मुलगा पोटविकाराने त्रस्त होता. त्याच्यावर ऑस्ट्रेलियात व्यवस्थित उपचार झाले नाहीत. डॉक्टरांनी आपल्या मुलावर व्यवस्थित उपचार केले नाहीत, अशी तक्रार तिने केली होती. या तक्रारीनंतर स्थानिक पोलीस व काही अनिवासी भारतीयांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केला. तेथील कायद्यानुसार मुलांचे पोषण व्यवस्थितपणे होत नाही, असा आरोप प्रियदर्शिनीवर केला होता. त्यानंतर तिच्या दोन मुलांना सरकारने ताब्यात घेतले होते. आता या दोन्ही मुलांना भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांची मदत घेण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेतला आहे. डेथनोटमध्ये प्रियदर्शिनीने सिडनी येथील वेर्ली स्ट्रीट येथे राहणाऱ्या काही जणांच्या नावांचा उल्लेख केला आहे. आनंद गोरू, अजित गोरू, श्रीनिधी गोरू या अनिवासी भारतीयांबरोबरच जबूर, डॅनियर, रायमंड त्याचा मुलगा तन्या आदी जण आपल्या मृत्यूला कारणीभूत आहेत, असा स्पष्ट उल्लेख प्रियदर्शिनीने डेथनोटमध्ये केला आहे. आईच्या आत्महत्येनंतर ऑस्ट्रेलियात अडकलेल्या तिच्या दोन मुलांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.









