स्वत:च्या वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टीचे नियोजनही केले होत
म्हासुर्ली : धामणी खोऱ्यातील गवशी (ता. राधानगरी) येथील युवक रुपेश कृष्णा पाटील (वय 23) याने स्वत:च्या वाढदिवसा दिवशीच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. रुपेश पाटील हा कळे (ता. पन्हाळा) येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तसेच पोलीस भरतीची तयारी करत बाहेर किरकोळ कामे करत होता.
यावर्षी त्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू केले होते. परंतु आर्थिक अडचणीमुळे घराचे बांधकाम अर्ध्यात राहिले आहे. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून निराश होता. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊन आल्यापासून अस्वस्थ होता. त्याने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टीचे नियोजनही केले होत.
नवीन घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे तो आजी-आजोबांच्या घरी राहत होता. मात्र दुपारच्यावेळी आजी-आजोबा झोपल्याचे व घरातील माणसे शेताकडे गेल्याची संधी साधून रुपेशने घराच्या तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे निदर्शनास येतास नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपचाराकरीता कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात याची नोंद झाली नव्हती.









