शनिवार 16 एप्रिल रोजीची सकाळ उजाडते न उजाडते तोच भ्रमणध्वनी एक दुःखद बातमी घेऊन आला. सुहासभाईंचे देहावसान झाले! क्षणभर विश्वासच बसेना. मन सुन्न झालं. गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी तुमच्याच म्हापशाच्या हॉटेलच्या हॉलमध्ये समाजाच्या प्रस्तावित पतपेढीच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर चर्चा करण्यासाठी आपणास एक बैठक बोलावलेली. प्रकृती स्वास्थ काहीसं बिघडलेलं असतानाही आपण दस्तुरखुद्द त्या बैठकीचं आयोजन केलेलं. तब्बल दोन तासांच्या बैठकीत आपण असंख्य सूचना केल्या. म्हणालात ‘एवढे आजच्या घडीला प्रमोटर्स आहेत ते पुरेसे नाहीत. आणखीन प्रमोटर्स केले तर शेअर होल्डर्सचा आवश्यक आकडा गाठणे शक्य होईल.’
‘पुन्हा लवकरच भेटू’ असं आश्वासन देऊन ती बैठक तुम्ही आटोपती घेतली. ‘पुन्हा लवकरच भेटू’ हे तुमचे आमच्याशी व्यक्त केलेले शेवटचे शब्द! आजही कर्णपटलावर काटय़ासारखे टोचताहेत. लवकर भेटण्याचा शब्द देऊन अवघ्या 36 तासांच्या आत इहलोकाची यात्रा संपवलीत का? समाजाविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणारा तुमच्यासारखा अवलिया सापडणं खरंच तर दुरापास्त. आपल्या समाजबांधवावर एखादं संकट आलं वा एखादं अघटितत घडलं, तर तुम्ही फार हळवे व्हायचे. मराठी भाषेवर आपलं नितांत प्रेम! समाजाच्या प्रत्येक कार्यात मराठी भाषा आवर्जून बोलली जावी हा तुमचा अटृहास असायचा आणि तुम्ही स्वतः तो कटाक्षाने पाळायचे. इंग्रजीच्या अती वापराने आपल्या मराठी भाषेची गळचेपी होते. तिच्यावर अन्याय होतोय अस एखाद्या कार्यक्रमात तुम्ही पोटतिडकीने अन् परखडपणे बोलायचे.
मागच्या महिन्यात तुमची पंचाहत्तरी मोठय़ा दिमाखात व उत्साहात साजरी झाली. वास्तविक पंचाहत्तरीच्या भव्यदिव्य कार्यक्रमात तुम्ही सुटाबुटात वावराल असं वाटत होतं. पण एवढे ऐश्वर्य पायाशी लोळत असताना, तुम्ही एक प्रथितयश व्यावसायिक अतिशय साध्या कपडय़ात आणि पायात स्लीपर घालून वावरताना पाहून खरंच तुमच्या साधेपणासमोर नतमस्तक व्हावे असं वाटलं.
96 कुळी मराठा संघ बार्देश या संघाची तुम्ही स्थापना तुम्ही केली. विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्रित करून त्यांच्या मुलांनी वेगवेगळय़ा स्तरांवर मिळवलेल्या यश अन् नावलौकीक यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावली म्हणून दरवर्षी त्यांच्यासाठी सत्कार सोहळा तुम्ही आयोजित करू लागलात.
सुहासजी, तुम्ही हवे होता कारण समाजाचं, ज्ञाती बांधवाची अनेक कामे करण्यासाठी तुमच्या सारख्या निःस्पृह आणि जिद्दी व्यक्तीची गरज आहे. नुकतेच कुठे बाळसे धरत असलेल्या तुमच्या स्वप्नातील पतपेढीचा व्याप वटवृक्षासारखा होऊन असंख्य समाज बांधवांना आधार व आसरा मिळवून देण्यासाठी जी कार्यतत्परता तुमच्यापाशी होती. तुम्ही होता म्हणून आम्ही निश्चित होतो. निर्धास्त होतो. पण तुम्ही आम्हा 96 कुळी मराठा संघाला पोरके करून गेलात.
तेव्हा कंठ ओला होतो
शब्दांना जेव्हा रडायचं असतं
तेव्हा ओठ स्निग्ध होतात
अशाच एका सांज राती
मोकळेपणी बोलून गेलात
आम्हाला मात्र आठवणींचे
शब्द ओले ठेवून गेलात.
आपल्या आत्म्याला चिरशांती लाभो
सुधीर मयेकर (परब) थिवी, बार्देश









