शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे, तर दुसरीकडे त्याची मुलगी सुहानाचा पदार्पणाचा चित्रपट ‘द आर्चीस’ हा 7 डिसेंबर रोजी झळकणार आहे. चाहत्यांना या दोन्ही चित्रपटांची प्रतीक्षा आहे. पिताकन्येची ही जोडी चित्रपटात एकत्र दिसून यावी अशी काही चाहत्यांची इच्छा असून लवकरच ती पूर्ण देखील होणार आहे.

शाहरुख खान आणि सुहाना हे सुजॉय घोषच्या आगामी चित्रपटात दिसून येऊ शकतात. सुजॉयचा हा चित्रपट स्पाय थ्रिलर स्वरुपाचा असून यात शाहरुख अन् सुहाना मुख्य भूमिका साकारू शकतात. चित्रपटात शाहरुख एक्सटेंडेड पॅमियो स्वरुपाची भूमिका साकारू शकतो. या स्पाय थ्रिलरमध्ये सुहाना ही गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सुरू झाले आहे. यापूर्वी शाहरुख आणि सुजॉयने ‘बदला’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. या चित्रपटात तापसी पन्नू, अमृता सिंह आणि अमिताभ बच्चन यासारखे कलाकार होते. शाहरुखच्या जवान या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाकरता मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. या चित्रपटात सुनील ग्रोवर, विजय सेतुपति, नयनतारा, दीपिका पदूकोन आणि सान्या मल्होत्रा हे कलाकार देखील दिसून येणार आहेत.









