मजुरांचा तुटवडा अन् वेळेत उचल होत नसल्याने लागवडीत दिवसेंदिवस घट
वार्ताहर/उचगाव
बेळगावचा पश्चिम भाग हा ऊस लागवड आणि ऊस उत्पादनात सातत्याने अग्रेसर असतो. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि येणारी विविध संकटे, तसेच साखर कारखान्याकडून वेळेत उसाची उचल होत नसल्याने ऊस लागवडीत दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी ऊस हंगाम संपल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड टोळ्यांनी ‘सुटलो एकदाचे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. टोळ्या परतू लागल्या असून, शेतकरी पुढच्या कामाच्या हंगामात गुंतल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
चालू वर्षीचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होऊन फेब्रुवारी महिन्यात ऊस तोडणीचा हंगाम संपत आला. यंदा लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे ऊस गळीत हंगाम तीन ते चार महिने चालला. ऊस तोडणी कामगारांचा तुटवडा आणि तोडणी टोळ्या मोठी खुशाली मागत असल्याने शेतकऱ्यांनाही मोठी चिंता लागून राहिली होती. दरवर्षी लातूर, बीड, उस्मानाबाद आदी भागातून ऊसतोडणी कामगार येतात. यावर्षी त्या अल्प प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांनी मिळेल ती टोळी घेऊन व स्थानिक कामगारांच्या सहकार्यातून ऊसतोडणी केली. कामगारांच्या तुटवड्यामुळे ऊस तोडणीलाही थोडा विलंब झाला. मात्र आता जवळपास ही तोडणी अंतिम टप्प्यात असून, जवळजवळ ऊस संपल्याचेही चित्र काही भागात दिसून येत आहे.
तोडणीला विलंब : लागवडीत घट
अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अद्याप जमा केलेली नाहीत. काही बिले विलंबाने जमा करण्यास सुऊवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक चंचण भासू लागली आहे. गेल्या काही वर्षापासून बेळगाव तालुक्यातील उसाची महाराष्ट्रातील अनेक कारखाने उचल करत असत. मात्र हलकर्णी, चंदगड तालुक्यातील जवळपासच्या काही कारखान्यांनी सुद्धा वेळेत म्हणावी तशी उचल केली नसल्याने ऊसतोडणीला थोडा विलंबही झाला. त्यामुळेही पश्चिम भागातील काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली. परिणामी ऊस पिकात सातत्याने घट होत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. मात्र सध्या काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थोडा धीर आल्यासारखे वाटल्याने यावर्षी पुन्हा थोडी ऊस लागवडीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याही कारखान्याकडून म्हणावी तशी उचल झाली नाही.
प. भागात गुऱ्हाळे बंद
अलीकडच्या काळात पश्चिम भागात बहुतांश ठिकाणचा गुऱ्हाळ व्यवसाय पूर्णत: बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही गावातून हाताच्या बोटावर मोजण्या इतके गुऱ्हाळ व्यवसाय सुरू असल्याचेही चित्र आहे. एकंदरीत मजुरांचा तुटवडा, कारखान्याकडून वेळेत न होणारी उसाची उचल अशा अनेक कारणाने आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.









