कोल्हापूर: संतोष पाटील
साखरेसह इथेनॉल, सहविज प्रकल्प, बॉयोगॅस, ग्रीन हायड्रोजन, मोलॅसिस आदी विविध प्रकारच्या उत्पादनांमुळे 2022-23 या हंगामात साखर उद्योगाने एक लाख आठ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. येत्या तीन वर्षात महाराष्ट्रातील साखर उद्योग तीन लाख कोटी रुपयांपर्यत वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारा साखर उद्योग प्रगतीची नवी उंची गाठत असतानाच उसउत्पादकांना अच्छेदिन येतील यात शंका नाही.
इस्माच्या अहवालानुसार यंदाच्या गळीत हंगामात उसाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला. तरीही राज्यात 105.27 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यासोबतच साखर कारखान्यांना 130 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यात यश आले आहे. साखर, इथेनॉल आणि इतर उपपदार्थांमधून या वर्षी साखर उद्योगाची एकूण उलाढाल 1 लाख आठ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. येत्या तीन वर्षांत उसाचे क्षेत्र व उत्पादन वाढ, साखरेसोबत इथेनॉलचे प्रमाण वाढणे, तसेच ग्रीन हायड्रोजन, कॉम्प्रेस्ड बायो गॅस, वीज या उपपदार्थांचे उत्पादन यामुळे साखर उद्योगाच्या उलाढालीत भर पडेल. यामुळे हा उद्योग अजून तिप्पट व्यवसाय करणार असल्याचे संकेत आहेत.
गळीत हंगामात सहकारी आणि खाजगी अशा एकूण 210 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. 15 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात 1053.66 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. 105.27 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामातील 33 हजार 477 कोटी रुपयांपैकी 32 हजार 233 कोटी रुपये एफआरपी अदा केली. तब्बल 96.28 टक्के एफआरपी देण्यात कारखान्यांना यश आले आहे. 105 कारखान्यांनी शंभर टक्के एमआरपी दिली आहे. कारखान्यांकडे अजूनही 1244 कोटी रुपयांची एफआरपी देयके आता थकीत आहेत.
इथेनॉलचा हातभार
साखर उद्योगाची भरभराटीमध्ये सहवीज प्रकल्पासह बायप्रोडक्टस्चा हातभार असला तरी इथेनॉलची निर्मिती आणि चांगला दर हे आर्थिक उंची गाठताना महत्वाचे ठरत आहेत. केंद्र सरकारने 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी साखर कारखानदारांना मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. इथेनॉलची मागणी वाढत आहेच सोबत चांगला दरही मिळत असल्याने साखर कारखाने इथेनॉलचे उत्पादनही वाढवत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा 130 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. त्यामुळे कारखान्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. कंप्रेस्ड बायोगॅस, ग्रीन हायड्रोजन देखील भविष्यात साखर उद्योगाच्या व्यवसायात मोठी भर घालतील. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील तीन वर्षात उस उत्पादक शेतक्रयांचे उत्पन्न किमान दुप्पट होण्याची शक्यता नोंदवली जात आहे.