कारखाना बंद तरीही शेतकरी घेतात पिक : शेजारील राज्यातील ठेकेदारांकडून फसवणूक
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील एकमेव असलेला संजिवनी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने शेकडो ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. लागवड केलेल्या ऊसास ग्राहकच नसल्यामुळे मोठी नुकसानी सहन करावी लागत असून शेजारील राज्यातील व्यापारी तथा ठेकेदार येथे येऊन खरेदीच्या नावाखाली या शेतकऱयांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत.
1972 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या कारखान्याने प्रारंभीच्या काळात भरीव कामगिरी दर्शवत अनेक शेतकऱयांना चांगली कमाई करून दिली होती. परंतु गेल्या सुमारे दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे हा कारखाना तोटय़ात गेला आणि अखेरीस तीन वर्षांपूर्वी तो बंदच करण्यात आला. त्यावेळी शेतकऱयांना लवकरच त्याच जागेवर अत्याधुनिक कारखाना उभारण्यात येईल, तसेच इथनॉल सारखी अन्य सहउत्पादनेही घेण्यात येतील, अशी आश्वासने देण्यात आली होती. परंतु अद्याप ती प्रत्यक्षात साकारलेली नाहीत. त्यातून शेतकऱयांचे मात्र प्रचंड हाल झाले आहेत.
शेतकऱयांत, उत्पादनातही घट
राज्यात सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा, सत्तरी, डिचोली आणि पेडणे या तालुक्मयात ऊस लागवड करण्यात येते. त्यात सांगे तालुक्याचा वाटा सर्वाधिक आहे. 2017-18 पर्यंत राज्यात एक हजाराच्या आसपास शेतकरी ऊस उत्पादन घेत होते. त्याद्वारे सुमारे 789.48 हेक्टर जमीन लागवडीखाली होती व त्यांनी सुमारे 47,503 टन ऊसाचे उत्पादन घेतले होते. नंतरच्या काळात शेतकऱयांचीही संख्या कमी होत गेली आणि परिणामी उत्पादनातही घट झाली.
शेतकऱयांची होतेय पुरती फसगत
2020 मध्ये सरकारने कारखान्याचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली असली तरी लवकरच नवीन कारखाना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने त्यावर विश्वास ठेऊन काही शेतकऱयांनी उत्पादन चालूच ठेवले आहे. काही जणांनी भाजीपाला सारखी अन्य उत्पादने घेतली, तर काही जणांकडे अन्य पर्याय नसल्याने त्यांनी ऊसाचीच लागवड केली. परंतु आता त्यांची पुरती फसगत झाली आहे.
ऊस विक्रीसाठी करावा लागतो संघर्ष
नाही म्हणण्यास कारखान बंद पडल्यानंतर सरकारने त्यांचा ऊस खरेदी करण्यासाठी शेजारील राज्यांतील व्यापारी आणि साखर कारखान्यांशी व्यवहार केला. त्यातून शेतकऱयांना थोडा दिलासा मिळाला. परंतु ही मदत केवळ एका वर्षासाठीच करण्यात आली. परिणामी गेल्या दोन वर्षांपासून त्यांना ऊस विकण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
गेल्या वषी काही ठेकेदारांनी प्रति टन 600 रुपये देण्याचे आश्वासन देऊन ऊस खरेदी केला. परंतु अनेक शेतकऱयांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, संजिवनीच्या परिसरात इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ’रिक्वेस्ट फॉर कोटेशन’ मागविण्यात आले असून अद्याप ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नेमके चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.









