कर्नाटकच्या गाळप परवानगीमुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने अडचणीत
by इम्रान मकानवार
कागल : कर्नाटकातील साखर कारखान्यांना महाराष्ट्राच्या आधीच गाळप हंगाम सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने सीमा भागातील कारखान्यांसमोर पुन्हा एकदा ऊस पळवा पळवीचे संकट उभे राहिले आहे. कर्नाटक शासनाने यापूर्वी जाहीर केलेली १ नोव्हेंबर ही गाळप सुरू करण्याची तारीख बदलून आता २० ऑक्टोबर पासून कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
गेल्यावर्षी कर्नाटकातील कारखान्यांनी महाराष्ट्रातून तब्बल ४५ लाख मेट्रिक टन ऊस उचल केला होता. परिणामी महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना ऊसटंचाईचा मोठा फटका बसला होता. यंदाही महाराष्ट्रातील कारखाने सुरू होण्यापूर्वी कर्नाटकातील कारखाने १० दिवस अगोदरच कर्नाटकातील कारखान्यांना २० ऑक्टोबरपासून परवानगी सुरू होणार असल्याने सीमा भागातील ऊस उत्पादकांमध्ये हालचाल सुरू झाली आहे.
कर्नाटकातील कारखान्यांचे गाळप प्रमाण हे त्यांच्या राज्यातील ऊस उपलब्धतेपेक्षा जास्त असल्याने ते महाराष्ट्रातून ऊस आणतात. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांना स्पर्धा, ऊसटंचाई व उत्पादनात घट या तिहेरी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सीमा भागातील साखर कारखान्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. कर्नाटकातील कारखान्यांच्या समकक्ष म्हणजेच २० ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सीमा भागातील कारखान्यांनाही गाळप परवानगी द्यावी, अन्यथा ऊस पळवा पळवीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.








