पाच एकरातील ऊस पिकाचे दीड लाखाचे नुकसान : बंदोबस्ताची मागणी
वार्ताहर/गुंजी
गेल्या गुरुवारपासून येथील ऊस मळ्यात हत्तींनी हैदोस घातला असून दररोज सायंकाळी ऊस खाणे हा नित्यक्रम बनला आहे. त्यामुळे येथील शेतकरी जैनू रवळू नाळकर यांच्या पाच एकरातील ऊस पिकाचे हत्तींनी प्रचंड नुकसान केले आहे. सदर शेतकऱ्याचे जवळजवळ दीड लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. नायकोल भागातून आलेल्या हत्तींनी या ठिकाणी सध्या ठाण मांडले असून सुरुवातीस तीन हत्ती तर आता पुन्हा त्यामध्ये चार हत्ती आणि तीन पिलांची भर पडल्याने हत्तींचा मोठा कळपच तयार झाला आहे. सदर कळप आठवडाभर नित्यनेमाने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत ऊस मनसोक्त खात असल्याने सदर शेतकरी पूर्णपणे खचला आहे. वर्षभर काबाडकष्ट करून ऐन तोडणीवेळी हत्तीच्या कळपाने ऊस पिकावर ताव मारून संपूर्ण पीक खाऊन फस्त केले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे मानसिक संतुलनच बिघडले असल्याचे सांगितले जात आहे.
पाईपलाईनचेही नुकसान
सदर मळ्यामध्ये ऊस पिकाला पाणी देण्यासाठी घालण्यात आलेल्या पाईपलाईनचेही हत्तींनी नुकसान केले आहे. स्प्रिंकलर पाईप गुंडाळून तोडून टाकण्यात आले आहेत तर पीव्हीसी पाईपचे तुकडे करून नाल्यात फेकले आहेत. त्यामुळे संपूर्ण पाईपलाईनच उद्ध्वस्त करून टाकल्याने याचाही मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला झाला आहे.
वनखात्याकडून पंचनामा
गुंजी सेक्शन फॉरेस्टर राजू पवार यांना याविषयी विचारले असता सदर पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी लोंढा वनाधिकारी तेज वाय. पी. यांच्या समक्ष बुधवारी सायंकाळी करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी वन कर्मचारी रात्रंदिवस ठाण मांडून आहेत. तरीही हत्तींकडून नुकसान होत असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच सदर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले.









